सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीचे ४२ पूर्ण कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार; आयुक्तांनी दिले आदेश

By Appasaheb.patil | Published: January 18, 2023 12:43 PM2023-01-18T12:43:32+5:302023-01-18T12:43:46+5:30

उर्वरित कामे आहेत प्रगतिपथावर

Various development works have been done in the city under the Solapur Smart City scheme. | सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीचे ४२ पूर्ण कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार; आयुक्तांनी दिले आदेश

सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीचे ४२ पूर्ण कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार; आयुक्तांनी दिले आदेश

googlenewsNext

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूर शहरात पूर्ण झालेली ४२ कामे आता महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची कार्यवाही वेगात सुरू करण्यात आली आहे. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्या कामांचे हस्तांतरण करण्यात येणार असून, संबंधित विभागाने त्या त्या कामाविषयी अटी व शर्ती तपासून संपूर्ण अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधित विभागास दिले आहेत.

सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्तांनी घेतला. यासंदर्भात अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जी कामे पूर्ण झाली आहेत, ती कामे हस्तांतरण करून घेण्यात येणार आहेत. महापालिकेच्या त्या विभागाने संपूर्ण तपासणी करून ती ती कामे ताब्यात घ्यावयाची आहेत. तत्पूर्वी त्या त्या कामांची सर्व कागदपत्रे, टेंडरप्रमाणे करार, शर्ती व अटी तपासून सविस्तर अहवाल एका आठवड्यात महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाचा आहे. त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी सांगितले.

उर्वरित सहा कामे प्रगतिपथावर

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात एकूण ४९ पैकी ४२ कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, इमारत बांधकाम, आयटी, इंदिरा गांधी पार्क स्टेडियम फेज २, सावरकर जलतरण तलाव, आदी कामे चालू आहेत. पार्क स्टेडियममधील क्लब हाऊस, जिमखाना, टेबल टेनिस हॉल, मुळे पव्हेलियन, खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉलचे ग्राउंड, आदी कामेही पूर्ण झाली आहेत.

स्मशानभूमीची ११ कामे पूर्णत्वास

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील १४ स्मशानभूमींची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी आजतागायत ११ स्मशानभूमींतील कामे पूर्णत्वास आली असून, उर्वरित तीन स्मशानभूमींतील कामे प्रगतिपथावर आहेत. स्मार्ट सिटीतील कामे चांगल्या पद्धतीने झाली असल्याचा विश्वास संदीप कारंजे यांनी व्यक्त केला.

Web Title: Various development works have been done in the city under the Solapur Smart City scheme.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.