शिक्षकांनी उपक्रमशीलतेतून विद्यार्थी घडवावेत, प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा शिक्षण परिषदेची आढावा बैठकीत सचिवांनी दिल्या विविध सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:31 PM2017-11-23T15:31:59+5:302017-11-23T15:34:50+5:30
शिक्षकांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वत:कडे दृष्टी ठेवली पाहिजे. आपल्या उपक्रमशीलतेतून त्यांनी विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : शिक्षकांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वत:कडे दृष्टी ठेवली पाहिजे. आपल्या उपक्रमशीलतेतून त्यांनी विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत नंदकुमार यांनी मार्गदर्शन करून १०० टक्के प्रगत शाळा, शाळासिद्धी, राष्टÑीयस्तरावरील सर्वेक्षण, स्वच्छ विद्यालय पुरस्कार आदी बाबींवर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाºयांकडून आढावा घेतला.
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या सूचना दिल्या. नियमित शिकणाºया विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी आणि गणित विषयातील भीती दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माझी शाळा विकास निधीतून जिल्हा परिषद शाळांची प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी जिल्हास्तरीय प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. व्हर्च्युअल ट्रिपच्या माध्यमातून विज्ञान केंद्राव्दारे आॅनलाईन लाईव्ह सहल घडविणारा उपक्रम शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या संकल्पनेतून साकार झाला. त्या उपक्रमाचे उद्घाटन यावेळी नंदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या संकल्पनेतून थिंक टँक ग्रुपच्या माध्यमातून बेसिक इंग्लिश इनहासमेंट पुस्तकाचे प्रकाशन प्रधान सचिवांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख दिगंबर काळे, शिक्षक किरण बाबर, रवी चव्हाण, राहुल सुरवसे, ज्ञानेश्वर विजागती यांनी १०० प्रगत शाळांबाबत सादरीकरण केले.
--------------------
रिक्त पदे भरा...
शिक्षण सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे शिक्षण विभागातील वर्ग दोनची रिक्त पदे भरण्याच्या मागणीचे निवेदन दिले. जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. शाळांना येणारी वीज देयके कमर्शियल असतात. शाळा डिजिटल झाल्याने देयकांच्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे देयके भरताना आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे या वीज बिलांची तरतूद शासनस्तरावरून करावी, अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केली.