वारकऱ्याला लागली पन्नास लाखांची लॉटरी; 'तो' भाग्यवान विजेता कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:16 AM2020-01-12T11:16:45+5:302020-01-12T11:17:27+5:30
६ जानेवारीला पुत्रदा एकादशी होती महिन्याची ही वारी पोहचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात.
पंढरपूर : पुत्रदा एकादशीला आलेल्या भाविकांने श्री विठुमाऊलीच्या दर्शनानंतर घराकडे जाता जाता काढलेल्या १०० रुपयांच्या लॉटरी तिकिटाला चक्क ५० लाखाचे बक्षीस लागले आहे. ५० लाख जिंकलेला 'तो' भाग्यवान वारकरी भाविक कोण? याची उत्सुकता आता लॉटरी विक्रेत्यासह पंढरपुरकरांना देखील लागली आहे.
६ जानेवारीला पुत्रदा एकादशी होती महिन्याची ही वारी पोहचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात. यापैकीच एका अज्ञात श्री विठ्ठल भक्त वारकऱ्याने चौफाळा परिसरातील शोभा लॉटरी सेंटर मधून १०० रुपयांचे एक लॉटरी तिकीट विकत घेतले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नाताळ नवीन वर्ष सोडतीचे हे तिकीट असून या लॉटरी सोडतीचा निकाल ८ जानेवारी रोजी लागला आहे. ५० लाखाचे बक्षीस मिळविणारा तो भाग्यवान कोण याची उत्सुकता पंढरीत शिगेला पोहोचली आहे.
श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळ्यात आमचे लॉटरी दुकान आहे कोणी अज्ञात वारकरी भाविकांने पुत्रदा एकादशीच्या दरम्यान हे तिकीट विकत घेतले आहे. त्या भाविकाला ५० लाखांचे बक्षीस लागले असून तो लखपती भाविक कोण याचा शोध आम्ही घेत आहोत.
- सुरेश खोबरे, (लॉटरी विक्रेता)