वटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:17 PM2018-06-27T15:17:45+5:302018-06-27T15:19:27+5:30
जयदीप अन् प्रगती झगडे दाम्पत्याच्या सुखी संसाराची कहाणी
बाळासाहेब बोचरे
सोलापूर : मृत्यूच्या दाढेतून आपला प्रिय पती सत्यवानाला परत आणणारी सावित्री आपण पुराणात ऐकली. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून वटसावित्रीचा सण साजरा करतो. पण आजच्या विज्ञान युगात एका पतीने आपल्या प्रिय पत्नीला किडणी दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणून खºया अर्थाने प्रेमाची पावती दिली असून असाच पती प्रत्येकीला जन्मोजन्मी मिळावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मात्र एक पत्नी जाताच दुसरीसाठी बोहल्यावर चढण्याची घाई करणाºया जमान्यात जयदीप झगडे आणि प्रगती झगडे यांची कहाणी वेगळीच आहे. जयदीप हे मूळचे पुण्याचे असून ते तामलवाडी येथील बालाजी अमाईन्समध्ये नोकरीला आहेत. १५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली. पण पाच वर्षांपूर्वीपासून प्रगतीला किडणीचा त्रास सुरू झाला.
पुण्यामध्ये विविध उपचार केले, पण किडणी बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. रक्तातील नात्याशिवाय किडणी घेण्यास मान्यता नसल्याने माहेरच्या सर्वांच्या किडण्या जुळतात का हे तपासण्यात आले. पण बहुतांशी जणांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचा काही उपयोग झाला नाही. सर्वांत शेवटी पती जयदीप यांची किडणी तपासण्यात आली असता ती जुळली. पण पुराणमतवादी विचाराच्या काही मित्रांनी व नातेवाईकांनी किडणी न देण्याचा विचार जयदीपच्या मनात भरवला. एक गेली तर दुसरी मिळेल, असाही सल्ला दिला. पण जयदीप यांनी असल्या विचारांना जवळपासही फिरकू दिले नाही.
एक गेली तर मला दुसरी पत्नी मिळेल, हे जरी खरे असले तरी हिच्यासारखी दुसरी मिळेलच हे सांगता येणार नव्हते. शिवाय पत्नी मिळेल, पण माझ्या छोट्या लेकीला ममतेने वाढवणारी आई मिळणार नाही. हा विचार मनात ठेवून पत्नीसाठी किडणीदान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये त्यांच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आज हे कुटुंब सुखाने जगत आहे.
जन्मोजन्मी हाच पती मिळो...
- याबाबत प्रगती यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आज वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. पतीचा जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाºया बायका पाहिल्या असतील, पण पत्नीसाठी जीव पणाला लावणारा पती हा विरळाच आहे. त्यासाठी फार मोठे मन असावे लागते. तो मनाचा मोठेपणा जयदीपने दाखवला आहे. माझ्यासाठी जीवाचे रान करणारा नवरा मला या जन्मी मिळाला आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, असेच मी म्हणेन. आपल्या दानाने कोणाचा तरी जीव वाचत असेल तर समाजाने अवयवदान व रक्तदान करण्यास कधीच मागे-पुढे पाहू नये. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्या आधारे आपण कोणाचाही जीव नक्कीच वाचव ूशकतो.