व्हाॅट्स अपद्वारे होऊ लागले जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:58+5:302021-05-27T04:23:58+5:30
अशा परिस्थितीत शेतकरी, व्यापारी व्हाॅट्स अपवर आपल्याकडील गाय, म्हैस, बैल, खोंड यांचे फोटो टाकून त्याखाली किंमत व स्वतःचे ...
अशा परिस्थितीत शेतकरी, व्यापारी व्हाॅट्स अपवर आपल्याकडील गाय, म्हैस, बैल, खोंड यांचे फोटो टाकून त्याखाली किंमत व स्वतःचे मोबाईल नंबर टाकून जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाळ्यापूर्वी शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैलांसह दुभत्या गाई-म्हशींची खरेदी-विक्री करतात. मागील काळातील दुष्काळी स्थिती, चारा-पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे जनावरे सांभाळताना कसरत करावी लागत आहे. पशुधनात घट आल्याने अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय मोडीत काढले होते. मात्र अलीकडच्या काळात नैसर्गिक स्थिती चांगली असल्याने शेतकरी पुन्हा दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुभत्या जनावरांच्या दरात वाढ झाली. मात्र आता पुन्हा गेल्या वर्षभरापासून दूध व्यवसाय अडचणीत आहे.
कोरोना संसर्गाची वाढ होऊ लागल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दुधाला मागणी नसल्याचे सांगत दुधाचे दरही प्रति लिटरमागे सुमारे १० ते १५ रुपयांनी कमी झाले आहेत. याउलट दूध व्यवसाय अडचणीत असलेल्या काळात पशुखाद्याचे दर मात्र वाढले आहेत. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या दरावर झाल्याचे दिसत आहे. कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दर रविवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार बंद ठेवल्याने जनावरांची खरेदी-विक्री बंद आहे.
बाजार सुरू होण्याचे लागले वेध
जनावरांच्या बाजारात मोठ्या संख्येने जर्सी गाय, म्हैस, बैल, खोंड खरेदी-विक्रीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे मनाप्रमाणे जनावरांची खरेदी करता येत होती. जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी थेट व्हाॅट्स अपच्या माध्यमातून जनावरे खरेदी-विक्रीचा ऑनलाइन व्यवहार सुरू केला आहे. साधारण १ लाख रुपयांपर्यंत मिळणारी दुभती म्हैस आता ७० हजारांपर्यंत विकली जात आहे. ७० ते ८० हजारांपर्यंत विकली जाणारी दुभती गाय ४० ते ४५ हजाराला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना लॉकडाऊन संपून जनावरांंचे बाजार सुरू होण्याचे वेध लागले आहेत.