सणासुदीच्या दिवसात भाजीपाला महाग; वांगी, शेवगा पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 10:57 AM2021-10-25T10:57:41+5:302021-10-25T10:57:47+5:30
डाळ, कडधान्य, उसळ आणि बेसनाची मागणी वाढली
सोलापूर : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व वाढत्या इंधन दराचा फटका भाजीपाला बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळात किरकोळ भाजीबाजारातील दरही सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जुने ते सोनं म्हणत डाळ, कडधान्य, उसळ आणि बेसनाची घेत आहेत. यामुळे सध्या डाळ, कडधान्य, उसळ आणि बेसनाची मागणी बाजारात वाढली असल्याचे किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले.
वांगी, शेवगा पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग
बाजारात वांगी ८० ते १०० रुपये आणि शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये दराने विक्री केली जात आहे. यामुळे वांगी आणि शेवगा पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग आहेत. तर सध्यस्थितीत किरकोळ बाजारात कोथिंबीर ५ ते १० रुपयांना मिळणारी पेंडी ५० ते ७० दराने विकली जात आहे.
असे आहेत भाज्याचे किलोचे दर
शेवगा ११०, वांगे ८०, टोमॅटो ४०, तोंडली ८०, फ्लॉवर ८०, कोबी ४०, गवार ६०, मिरची ४०, भेंडी ७०, काकडी ३०, बिट ५०, गाजर ६०, सिमला मिरची ६० कांदा ४०, बटाटा ६०, तर पालेभाजींमध्ये मेथी ४० रुपये जुडी, शेपू ६० रुपये, कोथिंबीर ५० रुपये असे आहेत.
---
जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व इंधनाचे दर वाढल्याने भाज्यांचे भाव वाढले होते. पूर्वी एक-दोन किलो भाजी घेऊन जाणारे ग्राहक आता केवळ पाव किलो भाजी घेऊन जात आहेत.
- प्रभाकर पिस्के, भाजी विक्रेते, कस्तुरबा मार्केट
गेल्या दोन -तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे वाढत आहेत. पहिला गॅस, खाद्य तेल, किराणानंतर आता भाजीपाला एवढा महाग झालेला आहे की, त्यामुळे विविध प्रकारच्या, बेसन, डाळी आणि उसळ यांचा जास्त वापर करीत आहोत.
- राजश्री मेणसे, गृहिणी
दर वर्षी उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे दर वाढत असतात. मात्र सध्या आठवड्याभराच्या भाजीपाल्यासाठी ५०० रुपये देखील कमी पडत आहेत. त्यामुळे घरातले बजेट संपूर्ण बिघडले. भाजीपाल्यापेक्षा बेसन, डाळी व कडधान्य परवडत आहे.
- श्रीदेवी बोमणे, गृहिणी
---