भाजीपाला जप्त करुन घातला प्राणिसंग्रहालयात प्राण्याला खायायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:48 PM2019-12-21T12:48:16+5:302019-12-21T12:51:08+5:30
सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई : नगरसेवकाच्या पत्रावरून कारवाई; बेकायदेशीर बांधकामावर हातोडा
सोलापूर : होटगी रोड विमानतळासमोरील मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाºयांवर गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला भाजीपाला जप्त करून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना घालण्यात आला.
या कारवाईमुळे नाराज झालेले शेतकरी महापालिकेच्या नावाने ओरडत होते. यानंतर डी-मार्ट समोर, दावत चौकातील अतिक्रमण काढण्यात आले. होटगी रोड आणि विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक करीत आहेत. हत्तुरेवस्ती परिसरात भाजी विक्रेत्यांमुळे रस्ता ब्लॉक होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी ७:३० ते ९ या वेळेत महापालिका अतिक्रमण विभागाने पोलिसांना सोबत घेऊन भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी भाजी विक्री करणारे आणि खरेदी करणाºयांमध्ये वाद सुरू झाला. परंतु कारवाई सुरूच राहिली.
अतिक्रमण विभागप्रमुख नीलकंठ मठपती यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत ५०० पेंढी मेथी, ८० पेंढी पालक, १०० पेंढी शेपू, २ पोती हिरवी मिरची, २ कॅरेट भेंडी, २ कॅरेट सिमला मिरची, १ पोते घेवडा, १०० पेंढी कांदा पात, ३ कॅरेट टोमॅटो, ५०० पेंढी कोथिंबीर, २ कॅरेट वांगी, १० किलो गाजर, १० नग प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले. यातील बहुतांश भाजीपाला प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात आला. डी-मार्ट समोर काही चायनीजवाल्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. हे बांधकाम तोडण्यात आले. दावत चौकात गाड्या जप्त करण्यात आल्या.
पोटासाठी भाजीपाला विक्री
- आमची भाजी जप्त करू नका, आम्ही कष्ट करून माल पिकवतो. आमचे नुकसान कशाला करता, असे काही शेतकरी ओरडत होते. पण अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. कॅरेट न देणाºया शेतकºयांकडून ते हिसकावून घेण्यात आले. काही शेतकºयांच्या मालाचे नुकसानही झाले. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.