झरेगाव येथे वाळू उपसा करणारी वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:50+5:302021-03-05T04:22:50+5:30
वैराग : बार्शी तालुक्यात झरेगाव येथील भोगावती नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करुन घेऊन जाणारी वाहने वैराग पोलिसांनी पकडली ...
वैराग : बार्शी तालुक्यात झरेगाव येथील भोगावती नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करुन घेऊन जाणारी वाहने वैराग पोलिसांनी पकडली आहेत. या कारवाईत पोलिसांनी एका ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५ लाख ७ हजाराचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील जुनोनी येथील एका व्यक्ती विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
वैराग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे चार वाजता बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे भोगावती नदी पत्रातून ट्रॅक्टर (एम.एच २५ एच. ६२१५) व त्यास जोडलेल्या ट्रॉलीतून ट्रॅक्टर चालक महेश राजेंद्र मुळे ( वय २४, रा. जुनोनी, ता. जिल्हा उस्मानाबाद) हा वाळू घेवून निघालेला होता.
झरेगाव हद्दीत ही वाहने आली असता पोलिसांनी ती पकडली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या मार्गदर्शनाखाली गौडगाव दुरक्षेत्राचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल धनाजी रामगुंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नाळे यांच्या पथकाने केली.