आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:20 PM2019-07-12T12:20:39+5:302019-07-12T12:23:37+5:30
आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
विलास मासाळ
पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत़ भाविक कोणतीही वस्तू घेतल्यानंतर त्यांना सुटे पैसे देण्यासाठी व्यापाºयांना अडचण होते; मात्र त्यांची सुटे पैशाची अडचण गोळ्या, बिस्किटे विकणारे मुले सुटे पैसे देऊन पूर्ण करतात. त्याबदल्यात ते १०० रुपयांवर १० रुपये कमिशन घेतात. हे पाहून सोपान सोळंके हे वारकरी म्हणाले, ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय.. आश्चर्यच की़...
आषाढी वारी सोहळा असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ हे भाविक विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाला जाताना तुळशी आणि फुलांचे हार, प्रासादिक वस्तू, देवदेवतांचे फोटो खरेदी करतात; मात्र त्यांनी १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये किंवा २ हजार रुपयांची नोट काढली तर त्यांना सुटे पैसे देण्यासाठी व्यापाºयांची अडचण निर्माण होते, पण त्यांची अडचण याच परिसरातील मुले दूर करताना दिसून येतात. कारण ही मुले दर्शन रांगेत गोळ्या, बिस्किट विक्री करून किंवा गोपीचंद टिळा लावून रोज हजारो रुपयांची चिल्लर गोळा करतात आणि ते चिल्लर पैसे १०० रुपयांवर १० रुपये कमिशनने देतात.
१२ जुलै रोजी आषाढी वारी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने गेल्या चार दिवसांपासून रेल्वे, एस़ टी़ आणि खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत़ ज्या-त्या भागातील वारकरी आपापल्या महाराजांच्या मठात, धर्मशाळेत उतरत आहेत़ निवासाची सोय झाल्यानंतर वारकरी आपल्या लागणाºया अत्यावश्यक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसतात; मात्र एक, दोन ते पाच रुपयावरुन दुकानदार आणि भाविकांमध्ये वाद-विवाद होत आहेत़ केवळ सुट्ट्या पैशाच्या कारणामुळे असे प्रसंग उद्भवताना दिसून येतात.
दुकानात कितीही सुटे पैसे आणले तरीही ते पुरत नाहीत़ त्यामुळे सुट्ट्या पैशाची व्यापाºयांना अडचण निर्माण होते़ संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातील दर्शन रांगेतील भाविकांना अनेक मुले गोळ्या, बिस्किट, चॉकलेट, पापडी, शेंगा, वटाणे आदी वस्तूंची विक्री करून एक रुपयांपासून ते १० रुपयांपर्यंतची क्वॉईन जमा करतात़ ही जमा झालेली चिल्लर व्यापाºयांना देतात पण १०० रुपयाला १० रुपये कमिशन घेतात़ म्हणजेच तो चक्क पैसे विकत असल्याचे दिसून येते़