‘गरीब, वंचित महिला सत्तेच्या उन्मादाच्या बळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:22 AM2018-05-28T04:22:50+5:302018-05-28T04:22:50+5:30
सत्तेचा उन्माद एवढा वाढला आहे की, त्यात गरीब-वंचित महिला बळी पडत आहेत. खैरलांजी ते कठुआ असा हा अत्याचार सुरू आहे. तेव्हा गप्प बसून चालणार नाही.
जिवप्पा ऐदाळेनगरी (सोलापूर) - सत्तेचा उन्माद एवढा वाढला आहे की, त्यात गरीब-वंचित महिला बळी पडत आहेत. खैरलांजी ते कठुआ असा हा अत्याचार सुरू आहे. तेव्हा गप्प बसून चालणार नाही. अन्यायाविरुद्धची लढाई सुरूच ठेवली पाहिजे, असे आवाहन रमाई चळवळीच्या सातव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी रविवारी येथे केले.
उपलप मंगल कार्यालयात उभारलेल्या माजी आमदार जीवप्पा ऐदाळेनगरीत रमाई चळवळीच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी ‘ऐदान’कार उर्मिला पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संमेलनाध्यक्षा हिरा दया पवार बोलत होत्या. स्वागताध्यक्षा शारदा गजभिये, कवी प्रा. विजयकुमार गवई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, शाहीर डॉ. अजीज नदाफ, आदी मंचावर होते. ऊर्मिला पवार म्हणाल्या की, बाबासाहेबांमुळे आपणाला विषमता समजली. सोलापूरचे नाव रमाईशी जोडले गेले, ते पंढरपूरमुळे. रमाईला पंढरपूरला जाण्यास बाबासाहेबांचा विरोध होता.
पंढरपुरातील संत मंडळींनी केवळ भक्ती जपली. सर्वांना समान स्थान देणारे पंढरपूर निर्माण करू, असे बाबासाहेबांनी रमाईला सांगितले होते.