अपहरणाचा संदेश देणारा व्हिडिओ व्हायरल झाला अन् आजीसोबतच्या ९ मुलांना पोलिसांनी घेराव घातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 11:36 AM2021-10-21T11:36:22+5:302021-10-21T11:36:27+5:30
सोलापूर लोहमार्ग पोलिसांची सतर्कता- ओळख पटल्यानंतर दिले सोडून
सोलापूर : नऊ लहान मुलांसोबत एका वयस्कर महिलेचा रेल्वनं प्रवास...जागरूक प्रवाशाला संशय आल्याने व्हिडिओ काढला अन् सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् सोलापूर लोहमार्ग पोलीस सतर्क झाले...धावती रेल्वे थांबवून आजीसोबत मुलांना ताब्यात घेतले...चौकशीनंतर ओळख पटली अन् त्या नऊ मुलांसोबत आजीला पोलिसांनी सोडून दिले.
ही घटना आहे मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर रेल्वे स्थानकावर घडलेली. त्याचं झालं असं की, गुलबर्ग्याहून मुंबईकडे निघालेल्या हुसेनसागर एक्स्प्रेसमधून एक आजी आपल्या नातवांना घेऊन मुंबईत राहणाऱ्या मुलांकडे रेल्वेनं निघाली होती. एक वयस्कर आजी अन् तिच्यासोबत लहान लहान मुलं हे सगळे पाहून एका जागरूक प्रवाशाला मुलांचे अपहरण होत असल्याचा संशय आला. तत्काळ त्या प्रवाशाने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. सतर्क कर्नाटक पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून तत्काळ सोलापूर लोहमार्ग पोलिसांना खातरजमा करण्यास सांगितले. तद्नंतर सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर आलेल्या हुसेनसागर एक्सप्रेसमधील एस ५ या बोगीतून त्या आजीला व मुलांना ताब्यात घेतले. रितसर सर्वत्र चौकशी व खातरजमा केल्यानंतर त्या आजीला सोडून देण्यात आले.
--------
लोहमार्ग पोलिसांनी दिली आजीच्या घरी भेट...
अपहरणाच्या संशयाखाली ताब्यात घेण्यात आलेली ती नऊ मुलं आजीच्याच मुलांचीच आहेत का ? याबाबतची खातरजमा करण्यासाठी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी कलबुर्गी लोहमार्ग पोलिसांना कळविले होते. त्यानंतर कलबुर्गी पोलिसांनी त्या आजीच्या पत्यावरील घरी भेट देऊन चौकशी केली असता ती लहान मुलं आजीचे नातवंडे असल्याचे समजले, तशी माहिती कलबुर्गी पोलिसांनी सोलापूर रेल्वे पोलिसांना दिली.
----------
‘चाईल्ड लाईन’ने केली मदत
अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी चाईल्ड लाइनशी संपर्क साधला. त्यानंतर चाईल्ड लाइनने पोलिसांच्या तपासकामात मोठी मदत केली. त्या आजीसोबत असलेल्या मुलांची ओळख पटविण्यात चाईल्ड लाइनने सतर्कता दाखविली.
------
कर्नाटक पोलिसांनी कळविल्यानुसार अपहरणाच्या संशयावरून हुसेनसागर एक्स्प्रेसमधील एका वयस्कर आजी व तिच्यासोबत असलेल्या नऊ अल्पवयीन मुलांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी करून ओळख पटून खातरजमा झाल्यानंतर त्या आजीला सोडून देण्यात आले.
- अमोल गवळी, पोलीस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलीस.