जयसिद्धेश्वरांच्या व्हिडीओ क्लिपचे तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:01 AM2019-04-02T06:01:32+5:302019-04-02T06:01:37+5:30
सोलापूर : सुट्टीत तुम्ही देवाला जाऊ नका, तेथे देव तुम्हाला भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे, असे वक्तव्य असलेला ...
सोलापूर : सुट्टीत तुम्ही देवाला जाऊ नका, तेथे देव तुम्हाला भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे, असे वक्तव्य असलेला सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपवर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी देवाला जाऊन नका, मंदिरात देव भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे असे वक्तव्य करून जनसामानच्या भावनेला हात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी केला आहे. संत तुकाराम महाराज यांनी सामान्य माणसात देव आहे असे म्हटले आहे. पण जयसिद्धेश्वर यांनी देव मीच असे म्हणून महाराजाचे अस्तित्व नाकारले आहे. पंढरपूर, तुळजापूरला जाऊ नका असे म्हणून तमाम जनतेचा अपमान केला आहे. एका पक्षाच्या जबाबदार उमेदवाराच्या तोंडी अशी असंवैधानिक भाषा सोबत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी जयसिद्धेश्वर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. स्वत:ला देव म्हणणे हा अहंभाव आहे. लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यामुळे ते घसरले आहेत अशी प्रतिक्रिया दिली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अॅड. गोविंद पाटील हे हास्यास्पद विधान असल्याचे म्हटले.
माफी मागा : मलिक
भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांच्या वक्तव्यावर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा व रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. वर्धाच्या सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्याचा आरोपही त्यांनी केला.