Video : धरिला पंढरीचा चोर... विठ्ठलमूर्तीजवळील पूजार्यानेच चोरले देणगीचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:01 PM2019-10-15T20:01:35+5:302019-10-15T20:02:34+5:30
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद; मंदिर समितीने केला गुन्हा दाखल
सोलापूर/पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या मूर्ती जवळील देणगी पेटीतून दिवसा ढवळ्या हातसफाईने पैसे चोरणाऱ्या पुजाऱ्याविरुद्ध मंदिर समितीने गुन्हा दाखल केला आहे. चोरी करणाऱ्या पूजार्याचे नाव अमोल ज्ञानेश्वर चिटणीस ( रा. इसबावी पंढरपूर) असे आहे. १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास एका भाविकाने श्री विठ्ठलाच्या मूर्ती जवळील देणगी पेठेमध्ये दोन हजार रुपयांची नोट टाकताना पोलीस हेडकॉन्स्टेबल वामनराव यलमार यांनी पाहिले होते.
१४ ऑक्टोंबर रोजी वामनराव यलमार यांनी लेखापाल विभागाचे लिपिक संभाजी मोहन देवकर यांना १२ ऑक्टोबर रोजी विठ्ठलाच्या चरणात समोरील देणगी पेटीतून २ हजार रुपयांची नोट दान म्हणून आली आहे का ? असे विचारले होते. संभाजी देवकर यांनी रजिस्टर तपासून २ हजार रुपयांची नोट देणगी पेटीतून जमा न झाल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वामनराव यलमार त्यांना संशय आल्याने त्यांनी मंदिर समितीचे कर्मचारी सावता हजारे यांच्यासह सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले.
त्या चित्रीकरनामध्ये १२ ऑक्टोबर रोजी एका भाविकाने श्री विठ्ठलाच्या चरणाजवळ दानपेटी मध्ये २ हजार रुपयाची नोट टाकलेली मंदिर समितीतील नित्योपचार विभागातील सेवक अमोल ज्ञानेश्वर चिटणीस ( रा. इसबावी पंढरपूर) आणि हात सफाईने चोरली असल्याचे दिसून आले. यामुळे मंदिर समितीच्या वतीने संजय नारायण कोकीळ (रा. भक्तीमार्ग, पंढरपूर) यांनी अमोल चिटणीस यांच्याविरुद्ध मंगळवारी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
शिताफीने देणगी पेटीतील पैशांची चोरी
भाविकांनी देणगी म्हणून दिलेली दोन हजार रुपयाची नोट देणगी पेटीमध्ये टाकताना ती पूर्णपणे न पडेल अशा पद्धतीनेच ठेवत होता. नंतर हार घेताना ती नोट मोठ्या शिताफीने काढून घेत होता. परंतु हा सर्व प्रकार सीसीटीव्हीचे उतरण पाहिल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल वामनराव यलमार यांच्या निदर्शनास आला.