Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 02:08 PM2024-10-27T14:08:57+5:302024-10-27T14:09:43+5:30

एक फॉर्म भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अर्जातील प्रत्येक कॉलम भरणे आवश्यक असून, उमेदवारांचा अर्ज दहा ते बारा अधिकारी पाच ते सात वेळा पडताळणी करून कागदपत्रे तपासली जातात.

Vidhan Sabha Election How many pages is the application for Vidhan Sabha candidature How much does it cost Know all the information | Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : निवडणूक म्हटलं की प्रत्येक घडामोडींवर प्रत्येकाची नजर असतेच. निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमेदवारानं किती खर्च करायचा, याबाबतचे नियम व अटी निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत. एका उमेदवाराला विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला किती खर्च येतो? अर्ज भरताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात? फॉर्म भरायला किती वेळ अन् किती खर्च येतो? याबाबतचा घेतलेला हा छोटासा आढावा. निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यास व स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज हा १०० रुपयाला मिळत असून, तो ४० पानांचा आहे. एक फॉर्म भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अर्जातील प्रत्येक कॉलम भरणे आवश्यक असून, उमेदवारांचा अर्ज दहा ते बारा अधिकारी पाच ते सात वेळा पडताळणी करून कागदपत्रे तपासली जातात. अंतिम निर्णय झाल्यानंतर तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला जातो. यावेळी मी दिलेली माहिती खरी असून, ती खोटी निघाल्यास माझ्यावर कारवाई करावी, अशी शपथ घ्यावी लागते. दरम्यान, उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीचे, अपडेटचे चित्रीकरण करण्यात येते.

ही माहिती हवी अर्जामध्ये उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, शिक्षण, एकूण संपत्ती, गाड्या, पॅनकार्ड, रेशन कार्ड, वीजबिल, नोटरी केलेले प्रमाणपत्र आदी विविध महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. अर्ज दाखल करतेवेळी मी अर्जात दिलेली माहिती ही खरी असून, खोटी आढळून आल्यास माझ्यावर कारवाई करावी, याबाबतची शपथ उमेदवारी अर्ज दाखल करणार्या प्रत्येकाला घ्यावी लागते. याचे चित्रीकरणही करण्यात येते.

गुन्ह्यांची माहिती, संपत्ती अन् बरेच काही 

अर्ज सादर करताना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वकिलाकडून नोटरी करून देणे बंधनकारक आहे. यात एकूण संपत्तीची माहिती, गुन्ह्यांची माहिती, वाहने, जमीन, शेती व अन्य विषयांसंदर्भात माहिती देण्यासाठी उमेदवार वकिलांचा सल्ला घेऊन ते नोटरीमध्ये लिखित स्वरूपात उतरवितात. छाननीवेळी ऑब्जेक्शन लागल्यास वकिलांमार्फतच तो सोडविला जातो. 

पक्षांना चिन्ह... अपक्षांना पसंतीची संधी.. 

राष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या उमेदवारांना त्यांचे त्यांचे चिन्ह असते. मात्र, अपक्ष उमेदवारांना चिन्ह कोणतं हवं त्यासंदर्भातील पसंत करण्यासाठी अर्जासोबतच तीन चिन्ह सांगावे लागतात, त्यातील जे उपलब्ध आहे ते चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी देतात. उमेदवारी अर्ज सादर करताना कार्यालयात किमान तासाभराचा वेळ लागतो. 

तर होतेय अनामत रक्कम जप्त 

अर्ज दाखल करताना उमेदवारास अनामत रक्कम भरावी लागते. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतापैकी १६.६ टक्के मते जर संबंधित उमेदवारास न पडल्यास अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडून जप्त केली जाते. उमेदवारी अर्ज हा इंग्रजी व मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक आहे. अनामत रक्कम भरताना ती रोख किंवा बँकेत भरावी लागते.


 

Web Title: Vidhan Sabha Election How many pages is the application for Vidhan Sabha candidature How much does it cost Know all the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.