विडी घरकुले असुरक्षित
By admin | Published: June 13, 2014 12:49 AM2014-06-13T00:49:27+5:302014-06-13T00:49:27+5:30
कुंभारीत १३ हजार कुटुंबे : सुरक्षा केवळ दोन पोलिसांवरच!
सोलापूर:शहरात आणि कुंभारीत विडी कामगारांसाठी घरकुले उभारली खरी, मात्र त्यांच्या सुरक्षेचा विचार करताना पुरेसे पोलीस अधिकारी, कर्मचारी देण्याचा विषय बाजूलाच फेकला गेला आहे. कुंभारीतील गोदुताई परुळेकर आणि माँसाहेब विडी घरकूलमध्ये १३ हजार कुटुंबांमधील अंदाजे ६५ हजार सदस्यांचा विचार करता तेथील सुरक्षा व्यवस्था केवळ दोनच पोलिसांवर चालत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हैदराबाद रोडवरील विडी घरकूलमधील स्थितीही वेगळी नाही.
सोलापूर शहर हे तसे कामगारांचे समजले जाते. विडी, यंत्रमाग कामगारांची संख्या अधिक आहे. विशेषत: विडी उद्योग क्षेत्रात महिला कामगारांची संख्या लक्षणीय आहे. विडी कामगारांचा विचार करून हैदराबाद रोडवर विडी घरकुले बांधण्यात आली. ७ चौैरस किलोमीटर जागेत अंदाजे चार ते साडेचार हजार कामगारांसाठी घरे बांधण्यात आली. ए ते आय ग्रुपमध्ये ही घरे बांधताना रस्त्याची आखणी करण्यात आली. त्यावेळी भविष्याचा विचार न करता केलेली आखणी कुठेतरी चुकली हे आज कोणीही सांगू शकेल. आज याच विडी घरकूल कामगार वसाहतीत अगदी दाटीदाटीने राहण्याची वेळ आली आहे. कोण काय करतो? परप्रांतातील कोणी इथे भाड्याने राहत असताना त्यांचा नेमका काय उद्योग आहे? असे एक नव्हे अनेक प्रश्न शहरवासीयांनाच काय पोलिसांनाही पडले असावेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विडी घरकूल पोलीस चौकीच्या अखत्यारीत विडी घरकूलचा परिसर येतो. बोटावर मोजण्याइतपत पोलिसांवरच येथील सुरक्षेची मदार अवलंबून आहे. भविष्यात एखादी विघातक घटना घडली तर पोलीसही त्यावर नियंत्रण आणू शकणार नाहीत. विडी घरकूलमधील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी चौकीत फौजफाटा असणे गरजेचे आहे, असा सूर विडी कामगारांना बोलते केले असता त्यांच्यातून ऐकावयास मिळाला.
-------------------------------
काय केले पाहिजे
विडी घरकूलमध्ये भाड्याने घर घेतलेल्यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे.
आपल्या घरातील भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली पाहिजे.
परप्रांतातील कोणी संशयित राहत असेल तर त्याच्यावर करडी नजर ठेवली पाहिजे.
परप्रांतातील कोणी राहत असेल तर त्याची पुरेशी माहिती असावी.
---------------------------------
अशी ही सुरक्षा यंत्रणा
एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी १४२ पदे मंजूर आहेत.
सध्या पोलीस ठाण्यात ११६ पदे उपलब्ध आहेत.
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एमआयडीसी, नई जिंदगी, विडी घरकूल या तीन चौक्या येतात.
विडी घरकूल चौकीत सपोनिसह दिवसा एक हवालदार आणि एक पोलीस कर्मचारी तर रात्री एक हवालदार आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावरच कामकाज चाललेले आहे.
साप्ताहिक सुट्या, रजा वगळता जे पोलीस कर्मचारी आहेत ती संख्या अगदी तोकडी आहे.
--------------------------------
कुंभारीत दोन विडी घरकुले; पोलीस मात्र दोघेच
सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीत गोदुताई परुळेकर आणि माँसाहेब ही दोन विडी घरकुले आहेत. एका घरात किमान ५ सदस्यांचा विचार करता १३ हजार कुटुंबांमधील ६५ हजार सदस्य या वसाहतीत राहत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही वसाहती वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. एखादी गंभीर घटना घडली तर ड्युटीवरील दोन पोलिसांसमोर पेच निर्माण होणार आहे.