विद्याभारतीची विजयी सलामी
By admin | Published: December 26, 2014 11:19 PM2014-12-26T23:19:34+5:302014-12-26T23:46:19+5:30
शालेय राष्ट्रीय खो-खो : इचलकरंजीत स्पर्धेला प्रारंभ
इचलकरंजी : येथे आजपासून सुरु झालेल्या १७ वर्षांखालील मुला-मुलींची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विद्याभारती व राजस्थानच्या मुलांच्या संघाने आणि कर्नाटकच्या मुलींच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर एका डावाने मात करुन विजयी सलामी दिली. इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली आहे. येथील जिम्नॅशियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या २६ व मुलांच्या २७ संघांनी सहभाग नोंदविला आहे.
आजचा सुरुवातीचा मुलांचा सामना विद्याभारती विरुद्ध दादरा व नगरहवेली या संघात झाला. या सामन्यात विद्याभारतीने ११ व नगरहवेलीने ६ गुण नोंदविले. हा सामना विद्याभारतीने १ डाव राखून ५ गुणांनी जिंकला. मध्य प्रदेश विरुद्ध राजस्थान यांच्यातील मुलांच्या सामन्यामध्ये राजस्थानने १० व मध्य प्रदेशने ७ गुण मिळविले. हा सामना राजस्थानने १ डाव राखून ३ गुणांनी जिंकला. दिल्ली विरुद्ध ओरिसा यांच्यातील चुरशीचा झालेला सामना दिल्लीने ५ गुणांनी जिंकला. दिल्लीने १८ व ओरिसाने १३ गुण मिळविले.
मुलींचा सलामीचा सामना आंध्र प्रदेश विरुद्ध गुजरात यांच्यात झाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी ९ गुण मिळविल्याने तो बरोबरीत सुटला. त्याचबरोबर मध्यप्रदेश विरुद्ध राजस्थान सामनासुद्धा बरोबरीत सुटला. कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड हा एकतर्फी सामना होऊन कर्नाटकला १५, तर उत्तराखंडला एकही गुण मिळाला नाही.
त्यामुळे हा सामना कर्नाटक संघाने एक डाव व १५ गुणांनी सहजपणे जिंकला.
इचलकरंजी येथे सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गुजरात विरुद्ध आंध्र प्रदेश संघादरम्यान सुरू असलेल्या सामन्यातील एक क्षण.
मुलांच्या गटात दिल्लीच्या खेळाडूंकडून ओरिसाच्या खेळाडूला खांबावर टिपतानाचे छायाचित्र.