उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विघ्नेशचा जम्मू काश्मिरमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:27 PM2019-05-20T14:27:27+5:302019-05-20T14:29:57+5:30
अडीच वर्षाच्या चिमुकल्याला आला होता ताप त्यात पुन्हा झटका आल्याने झाला मृत्यू
सांगोला : उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जम्मू काश्मिरला देवदर्शनासाठी गेलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला ताप आला. त्यात पुन्हा झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास जम्मू (श्रीनगर) या ठिकाणी घडली. विघ्नेश सुजीत दौंडे (वय अडीच वर्षे, रा. सांगोला-कोष्टी गल्ली) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.
सुजीत दौंडे हे पत्नी दीपाली, मुलगा विघ्नेश, मुलगी दुर्वा यांच्यासह रुपेश साळुंखे, संदीप दौंडे, नीलेश रसाळ, अनिकेत बोत्रे हे मित्र कुटुुंबासमवेत ८ मे रोजी वैष्णवीदेवीचे दर्शन व जम्मू (श्रीनगर) येथे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. वैष्णवीदेवीचे दर्शन घेऊन १८ मे रोजी श्रीनगर येथे मुक्कामी आले आणि १९ मे रोजी सहल आटोपून परतीच्या प्रवासाला निघणार होते; मात्र शनिवारी रात्रीच विघ्नेशला प्रचंड ताप आल्याने त्यास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र वातावरणातील बदल चिमुकल्याला सहन न झाल्याने रविवारी सकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सुजीत दौंडे हे विघ्नेशचा मृतदेह घेऊन जम्मू-मुंबई विमानाने मुंबई येथे पोहचले. मुंबईतून रुग्णवाहिकेमधून विघ्नेशचा मृतदेह सांगोल्यात आणल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.