मणिपूर घटनेच्या निषेधार्थ महिला-युवा आघाडीचे जोरदार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 01:20 PM2023-07-26T13:20:56+5:302023-07-26T13:21:04+5:30
जनवादी व वर्गीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर मणिपूर घटनेच्या निषेधार्थ "निषेध दिन" पाळण्याचा निर्धार केला
गेले तीन महिने मणिपूर जळत आहे. तेथे मेईती आणि कुकी या दोन जमातीमधील घोर हिंसाचारात शंभरहून अधिक लोक ठार झाले असून पन्नास हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यातील जनजीवन पूर्णतः उध्वस्त झाले आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूर मधील महिलांवर झालेल्या आत्याचारावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्याक्षा नसीमा शेख यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
जनवादी व वर्गीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर मणिपूर घटनेच्या निषेधार्थ "निषेध दिन" पाळण्याचा निर्धार केला असून त्या अनुषंगाने सोलापूर येथील पूनम गेट येथे महिला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख व डी.वाय.एफ.आय. चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना सिटू, अ.भा.जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख, सिटू चे राज्य उपाध्यक्ष माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, विक्रम कलबुर्गी, अँड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम आदींचा समावेश होता.