विजयदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाहीतच; बळीराम साठे यांनी तोंड उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 04:02 PM2019-12-28T16:02:10+5:302019-12-28T16:04:58+5:30
राजकारण; सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वातावरण झाले गरम
सोलापूर : राजकारण बदलेल तसे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत. कुणीही उठावं व काहीही म्हणावं हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालणार नाही. विजयसिंह मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसचे नाहीत असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिले.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्याची तयारी सुरू आहे. याबाबत गुरुवारी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे समन्वयक म्हणून बळीराम साठे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे साठे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ३१ डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार असल्याने जुळवाजुळव करण्यासाठी शुक्रवारी दुपारी बळीराम साठे हे झेडपीतील विरोधी पक्षाच्या कार्यालयात व्यस्त होते. कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी निवडणूक तयारीची पुढील सूत्रे हलविण्यास सुरुवात केली आहे. झेडपी व पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पक्षादेश बजाविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या दोन दिवसात सर्व सदस्यांना पक्षादेश पोहोच केला जाणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुण्यात मी राष्ट्रवादीत असे वक्तव्य केल्यामुळे या व्यक्तव्याची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मोहिते-पाटील यांचे वक्तव्य सत्तेसाठीच आहे, असा आरोप माळशिरस तालुक्यातील चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तम जानकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर शुक्रवारी हा विषय निघताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साठे गरजले. विजयदादा राष्ट्रवादीचे नाहीतच. आमचा त्यांच्याशी कधीही संबंध आलेला नाही. त्यामुळे कुणीही उठून काही म्हटले तरी आम्ही लक्ष देणार नाही. झेडपीत सत्ता स्थापनेसाठी आमची तयारी झाली आहे. आघाडीतील नेत्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्वजण आमच्याबरोबर राहतील असा विश्वास आहे. पदाबाबत प्रत्येकांच्या अपेक्षा असतात, पण यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. गुरुवारी सदस्यांबरोबर चर्चा केल्यावर सुमारे सहा जणांनी पदाबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे सर्वांनी आम्हाला सांगितले आहे.
झेडपीत जाणवला शुकशुकाट
- झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड जवळ आल्याने सर्वांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. प्रभारी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी जाहीर केलेली शुक्रवारची सभा रद्द करण्यात आली. हे बºयाच जणांना माहीत नव्हते. काहीजण झेडपीत येऊन लगेच परत गेले. गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर आज समविचारीची जुळवाजुळव सुरू होती. त्यामुळे कोण कोणत्या गोटात आहे हे कळले नाही.