सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विजयकुमार देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:12 PM2019-06-10T12:12:50+5:302019-06-10T12:21:04+5:30
बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतीपद भाजपकडे; भाजपची यशस्वी खेळी
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतीपद भाजपकडे आल्याने या पक्षाची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे.
सभापती निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात बैठक झाली़ या बैठकीत सभापतीपदासाठी पालकमंत्री देशमुख याचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी जाहीर केले.
तत्पुर्वी रविवारी सायंकाळी काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या घरी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांची संचालक मंडळासोबत बैठक झाली़ या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी स्वत: सभापती होण्याची इच्छा व्यक्त केली़ त्यानंतर राजकीय घडामोडी तीव्र स्वरूपाच्या झाल्या, त्यात पालकमंत्री व १३ संचालक एकत्रित अज्ञातवासात गेले व त्यांनी पालकमंत्र्याना सभापती करण्याचा निर्णय केला, त्यानंतर ही बाब दिलीप माने यांना समजताच त्यांनी नेतेमंडळींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत १३ संचालकांना घेऊन पालकमंत्री बाहेरगावी गेले होते़ त्यामुळे सोमवारी सकाळी बाजार समितीत झालेल्या निवडीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची बिनविरोध झाली.
या निवडीनंतर पालकमंत्री समर्थकांनी बाजार समिती आवारात जल्लोष केला़ शिवाय जल्लोष करण्यासाठी सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभाही एक तासासाठी तहकूब करण्यात आली.
या निवडीनंतर पालकमंत्री समर्थकांनी बाजार समिती आवारात जल्लोष केला, शिवाय जल्लोष करण्यासाठी सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभाही एक तासासाठी तहकूब करण्यात आली.