गावं १३१.. तलाठी ४५, गावकऱ्यांच्या भाऊसाहेबांकडं चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:20 AM2021-03-24T04:20:20+5:302021-03-24T04:20:20+5:30
अक्कलकोट तालुक्याचे क्षेत्रफळ भौगोलिकदृष्ट्या मोठे आहे. गावाची संख्या १३१ आहे. या तालुक्याकरिता जुन्या काळी ५५ तलाठ्यांची जागा निर्माण केल्या ...
अक्कलकोट तालुक्याचे क्षेत्रफळ भौगोलिकदृष्ट्या मोठे आहे. गावाची संख्या १३१ आहे. या तालुक्याकरिता जुन्या काळी ५५ तलाठ्यांची जागा निर्माण केल्या गेल्या त्यापैकी सध्या केवळ ४५ तलाठी कार्यरत आहेत. एकूण ५४ सज्जे असून, एका तलाठ्याकडे किमान ३ ते ५ गावे आहेत. अनेक गावांचा अतिरिक्त भार प्रत्येक तलाठ्यांकडे आहे.
तलाठी हा महत्त्वाचा घटक असल्याने वरिष्ठांकडून सातत्याने तातडीने माहिती पाठवण्यासाठी तगादा असतो. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना तीन-चार गावांचा कारभार पाहताना कसरत करावी लागत असल्याच्या व्यथा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
---
तलाठ्याकडे असलेली डझनभर कामे
नागरिकांचे रहिवासी, उत्पन्न, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, तसेच श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा यांची मानधन योजना, शेतीच्या नोंदी घेणे, सातबारा अद्यावत करणे, रेशन कार्डावरील नावे कमी करणे व समाविष्ट करणे, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अनुदान वितरित करणे, गौण खनिज उत्खनन रोखणे, सारा वसूल करणे, पंतप्रधान किसान योजना राबिवणे, पीकपाणी नोंदणे अशी डझनभर कामे आहेत. यामुळे एका गावच्या लोकांना वेळ देऊन वेळेवर त्यांची कामे करणे जिकिरीचे होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
----
तालुक्यात तलाठ्यांची संख्या कमी आहे. तालुक्याकरिता नुकतेच नवीन भरतीतील सहा जणांची नियुक्ती झाली आहे. यामुळे कामाला आणखीन बळ मिळणार आहे.
- अंजली मरोड, तहसीलदार
---
तालुक्यात तलाठ्यांची संख्या फारच कमी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ३ ते ५ गावे देण्यात आली आहेत. कामाचे ताण पडतो. लोकांच्या तक्रारी वाढतात. त्यातच सर्व्हर व्यवस्थित चालत नाही. यासाठी ग्रामसेवकाप्रमाणे प्रत्येक तलाठ्यांनासुद्धा एक सहायक कर्मचारी दिल्यास सोयीचे होणार आहे. महसूल विभागासाठी स्वतंत्र सर्व्हर असणे आवश्यक आहे.
- एन. के. मुजावर, तलाठी
----