ग्राम विकास समित्या कागदावरच, गावच्या विकासावर होतोय परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:55+5:302021-09-15T04:26:55+5:30
वडवळ : वडवळ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्तरीय एकाही समितीची स्थापना झाली नाही. यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुहूर्त कधी भेटणार, असा सवाल ...
वडवळ : वडवळ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्तरीय एकाही समितीची स्थापना झाली नाही. यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुहूर्त कधी भेटणार, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. या समित्या नसल्याने गावच्या विकासावर आणि कामांवर परिणाम होत आहे.
वडवळ ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवल्यानंतर एकमुखाने सर्वांनी याचे स्वागत करीत यास पाठिंबा दिला. नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार घेऊन आता जवळपास आठ महिने झाले तरी अद्याप एकही समिती स्थापन केली नाही. ग्राम बाल संरक्षण समिती, तंटामुक्त गाव समिती, रोहयो दक्षता समिती, जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवणारी दक्षता समिती, पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना समिती, जन्म मृत्यू नोंदणी समिती, वनव्यवस्थापन समिती, ग्रामस्वच्छता अभियान समिती अशा अनेक समित्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावातील विविध घटकांना सोबत घेऊन याद्वारे काम सुरू करण्यासाठी या समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तरी ग्रामपंचायतीला याकडे पाहण्यास वेळ नसून आणि याच पद्धतीने वाटचाल पुढे राहिल्यास या समित्या देखील कागदावरच राहतात की काय, अशी देखील शंका ग्रामस्थांना पडली आहे.
............
मी सचिव या नात्याने सर्व पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे थोडा विलंब झाला असेल. पुन्हा सर्वांशी बोलून लवकरच हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू
तात्या नाईकनवरे, ग्रामसेवक, वडवळ