गावोगावी बैठका... मतांच्या जुळवाजुळवीत कार्यकर्ते व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:01+5:302021-01-09T04:18:01+5:30
बार्शी : बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ७८ गावात थंडी असतानाही निवडणुकीचे ...
बार्शी : बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ७८ गावात थंडी असतानाही निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे़ गावोगावी पार्ट्यांची चलती आहे़ सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पाहुणे-रावळे, भावकीला गळ घालून मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या उपळाई ठोंगे व आगळगावात यंदा तिरंगी लढती होत आहेत़ त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे़ या निवडणुकीला पक्षीय रंग नसला तरी निवडणुका या पक्षांच्या नावावरच होत आहेत़ मात्र अनेक गावात एकाच पक्षाचे दोन पॅनल, तर कांही गावात दोन्ही पक्षांचा मिळून एक पॅनल असेही चित्र दिसत आहे़
----
उपळाईत यंदा प्रथमच तिरंगी लढत
तालुक्यातील क्रमांक तीनचे मोठे गाव असलेल्या उपळाई ठोंगे ग्रामपंचायतीमध्ये पाच प्रभागातील १३ जागांसाठी निवडणूक होत असून यासाठी ३६५७ मतदार मतदान करणार आहेत़ तर ३९ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत़ आजवर उपळाईमध्ये पाटील विरुध्द ठोंगे या दोन गटात लढत होत होती. यावर्षी दोन्ही गटांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिसरा पॅनल उभा करुन दुरंगी लढत तिरंगी केली आहे़ पाटील गटाचे नेतृत्व खासेराव पाटील, आबासाहेब ठोंंगे, हनुमंत जामदार,संतोष पाटील, बाळासाहेब खराडे करीत आहेत तर ठोंगे गटाची धुरा माजी सरपंच विजय ठोंगे व माजी सरपंच जयवंत कदम यांच्या खांद्यावर आहे़ तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व बाळासाहेब भोसले व संदीप बोटे यांच्याकडे आहे़ सध्या पाटील गटाची सत्ता आहे़ त्यापूर्वी ठोंगे गटाची सत्ता होती़
आगळगावात राऊत गटात दुफळी
शिक्षकांचे गाव म्हणून राज्यात परिचित आगळगावमध्ये विद्यमान आ़ राजेंद्र राऊत गटाचे जि. प. सदस्य किरण मोरे व माजी सरपंच सुमन गरड या गटात दुफळी निर्माण झाल्याने दोघांनीही आपल्या सोयीने पॅनल उभे केले आहेत़ येथे चार प्रभागात ११ जागा असून ३४६० मतदार आहेत आणि २६ उमेदवार उभे आहेत़ राऊत गटाचे झेडपी सदस्य किरण मोरे यांनी सोपल गटाचे बाजार समिती संचालक अभिमन्यू डमरे व विश्वनाथ जाधव यांना सोबत घेत पांडुरंग ग्रामविकास आघाडी तयार केली आहे़ तर माजी सरपंच सुमन गरड, मुकेश गरड व गणेश डमरे या आ़ राऊत समर्थकांनी विठ्ठल रुक्मिणी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उडी घेतली आहे़ दोन्ही पॅनलने ११ जागी उमेदवार उभे केले आहेत़ तर विकी लंगोटे व किरण गायकवाड यांनी दोन प्रभागात पाच उमेदवार उभे केल्याने प्रभाग २ व ४ मध्ये तिरंगी लढत होत आहे़
दहा वर्षांपासून अन्य गावात राऊत-सोपल गटात चुरस
याशिवाय बाभुळगाव,चारे, उपळे दुमाला, तडवळे, चिखर्डे, पिंपरी, बावी, ममदापूर, नारी आदी सारोळे, भालगाव, आदीसह छोट्या मोठ्या गावात देखील आ़ राजेंद्र राऊत विरुध्द माजी आ़ दिलीप सोपल गट अशा लढती होत आहेत़
---