ग्रामसुरक्षा यंत्रणामुळे गावांना सुरक्षित कवच; गुन्हेगारीला पायबंद लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 06:51 AM2021-10-01T06:51:29+5:302021-10-01T06:51:46+5:30
३५०० हजार गावाचा सहभाग : ४९ हजारांहून अधिक तक्रारी निकाली
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर हा प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये वायरलेसप्रमाणे काम करणार आहे. आपल्या गावांमधील गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी व गावातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित करण्यासाठी सर्व गावांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन या यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी केले
मंगळवेढा तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसुरक्षा दलाचे प्रमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पिंगळे, , सत्यजित आवटे, वाघमारे, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गोर्डे पुढे म्हणाले, आजपर्यत ३ हजार ५०० गावे यामध्ये सहभागी झाली असून, ७ लाखांहून अधिक तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.सोलापूर जिल्हयातील २५० गावे या योजनेला जोडली असून ३१ आक्टोबर अखेर एसपी तेजस्विनी सातपुते व सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा कार्यान्वित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला..ग्रामसुरक्षा यंत्रणा कनेक्ट करण्यासाठी १८००२७०३६०० हा नंबर असून यावर कॉल करून माहिती दिल्यास तात्काळ गावातील ग्रामस्थांचे मोबाईल खणखणतात व पोलिसांनाही याची माहिती मिळत असल्यामुळे सगळयाच्या गराडयात ते दरोडेखोर सापडत असल्याने त्याची यामधून सुटकाच होत नसल्याचे ते म्हणाले.
गावातील प्रत्येक नागरिकाने या यंत्रणेत आपला नंबर समाविष्ट करून घ्यावा. या व्यतिरिक्त गावातील महत्त्वाचे संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचे काम देखील या यंत्रणेतून होणार आहे. ग्रामसभेची सूचना, रेशनिंग बाबतची माहिती व अन्य महत्त्वाच्या सूचना यामधून देता येतील. मात्र संदेश देताना संदेश देणाऱ्याने स्वतःचे नाव, ठिकाण व संदेश स्पष्ट शब्दांत द्यायचा आहे.या यंत्रणा ही स्वंयचलित असल्याने येणारा प्रत्येक कॉलची पडताळणी करून तो संदेश पुढे जसाच्या तसा पोहचविला जातो. फेक मेसेज , कॉल टाळता येणार आहेत.ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्यासाठी कुठलाही खर्च अपेक्षित नाही. लागणारी फि ग्रामपातळीवर ग्रामपंचायत भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष शशांक गवळी, ग्रामसेवक संजय शिंदे, मरवडेचे संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गावातील प्रत्येक नागरिक सुरक्षित....
गाव परिसरात होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले बेपत्ता होणे, वाहनचोरी, गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग अथवा जळिताच्या घटना यासह कोणतीही दुर्घटना व गावातील महत्त्वाचे संदेश गावातील सर्व नागरिक व सोबतच परिसरातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, सरकारी यंत्रणा यांना त्यांच्या मोबाइलवर या यंत्रणेत सहभागी झाल्यानंतर एकाच वेळी संदेश देणाऱ्या व्यक्तीकडून जाणार असल्याने यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा गावासाठी सुरक्षा कवच आहे अशी माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी दिली.