चिंचोलीच्या पोलीस पाटील दाम्पत्याविरोधात ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:15 AM2021-06-23T04:15:58+5:302021-06-23T04:15:58+5:30
कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील महिला पोलीस पाटील ज्योती टोंगळे व त्यांचे पती सोमनाथ टोंगळे यांची पोलीस पाटील ...
कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील महिला पोलीस पाटील ज्योती टोंगळे व त्यांचे पती सोमनाथ टोंगळे यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांच्याकडूनच कायदा हातामध्ये घेऊन सर्वसामान्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी कुर्डूवाडी विभागाच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या काळात कायदा हातात घेऊन नागरिकांनाही मारहाण केली आहे. त्याचबरोबर गावात काही किरकोळ भांडणतंटा व इतर काही तक्रारी झाल्यास वादी व प्रतिवादी यांना माढा पोलीस ठाण्यात बोलावून दमदाटी केली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी तक्रारी अर्जात केला आहे.
कोरोनाकाळात मास्क लावून गाडीवरून शेताकडे जाणाऱ्या लोकांना अडवून लायसन्स विचारतात. लायसन्स जवळ नसल्यास ५०० रुपये दंड भरण्यास जबरदस्ती केली जाते. गावातील माहिती पोलिसांना चुकीच्या पद्धतीने सांगून कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या तक्रार अर्जावर ग्रामपंचायत सदस्य तानाजी लोंढे, कैलास लोंढे, तानाजी देवकुळे, राजकुमार घोडके, दत्तात्रय लोंढे यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.
.......
पोलीस पाटील व त्यांचे पती गावातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. किरकोळ कारण काढून त्यांच्या पतीकडून काहींना मारहाण झाली आहे. पोलिसांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन गावात दहशत निर्माण करत आहेत. याबाबत कंटाळून आम्ही सर्वांनी मिळून प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. कारवाई अपेक्षित आहे.
- तानाजी लोंढे
ग्रामपंचायत सदस्य, चिंचोली
......
संबंधितांनी केलेले आरोप व तक्रार चुकीची आहे. कोरोनाकाळात तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी व मी मिळून दंडात्मक कारवाई केली आहे. राजकीय हेतूने माझी व माझ्या पतीची काहीजण बदनामी करत आहेत.
- ज्योती टोंगळे
पोलीस पाटील, चिंचोली