महामार्गावर रस्ता दुभाजकच्या मागणीसाठी चार गावांच्या ग्रामस्थांनी अडवली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2022 05:25 PM2022-07-24T17:25:07+5:302022-07-24T17:25:17+5:30
मुरूम वाहतूक रोखली : १५ ऑगस्टला अक्कलकोटचा मार्ग रोखणार
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्देहळीकडे जाणाऱ्या पादचारी आणि वाहनासाठी रस्ता दुभाजक करण्याची मागणी करीत कुंभारीसह चार गावांतील प्रमुख ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. रस्त्यासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या त्यांनी अडवल्या.
यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे कर्देहळ्ळी फाट्याजवळ रस्ता दुभाजक आणि सेवा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळा ठिय्या आंदोलन केले. आज माजी जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी कर्देहळी, वडगाव आणि शिरपनहळ्ळी येथील ग्रामस्थ एकत्र आले. राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या. आमच्या मागणीचे पत्र दिल्याशिवाय मुरूम वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
मागण्यांचे निवेदन वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी स्वीकारले. ग्रामस्थांची मागणी न्याय्य असून, संबंधित विभागाकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे, कर्देहळीचे सरपंच नागेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पवार, सौदागर पवार, शाहू पौळ, हरिभाऊ कदम, राम जाधव, हरिभाऊ पोळ, व्यंकट पाटील, भास्कर पौळ, अशोक माने, पंडित कदम, राजू बिराजदार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------
..तर पुन्हा आंदोलन
रस्ता दुभाजक अथवा सेवा रस्ता मागणीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुन्हा १५ ऑगस्ट रोजी अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कृष्णा पवार यांनी दिला आहे. मंजुरीचे पत्र हातात पडेपर्यंत थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
-----