विरोध न करणारी गावे होणार लखपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:05+5:302020-12-26T04:18:05+5:30
माळशिरस तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ...
माळशिरस तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुका अटी-तटीच्या झाल्याने अनेक गावांत द्वेषाची भावना पसरते. वैचारिक मतभेदाबरोबरच वादाचे मुद्दे पुढे येतात. यामुळे निवडणुका संपल्यानंतरही अनेक वर्षे ही धुसफूस वादविवादाच्या रूपाने कायम राहते.
अशा वादग्रस्त ग्रामपंचायतींना विकासकामे करणे मुश्कील होते. याच आनुषंगाने गावकऱ्यांच्या वैचारिक प्रेरणेतून ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाल्यास गावाला शासकीय मदत मिळते. मात्र या टप्प्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना आमदार राम सातपुते यांनी प्रोत्साहनपर १५ लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोट ::::::::::::::::::::::
गावच्या तरुणांनी एकत्र येत गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात. यामुळे गावाचा एकोपा टिकून राहील. जे गाव बिनविरोध होईल, त्या गावाला प्रोत्साहनपर १५ लाख रुपये विकास निधी दिला जाईल.
- राम सातपुते
आमदार, माळशिरस