यापेक्षा गावचे सरपंचपद बरे!
By Admin | Published: June 10, 2014 12:31 AM2014-06-10T00:31:06+5:302014-06-10T00:31:06+5:30
जि. प. सदस्यांच्या भावना: पद संपत आले, एकही काम झाले नाही
सोलापूर: पद संपत आले, आतापर्यंत एकही काम झाले नाही, अडीच वर्षांत कसलेच काम झाले नाही, कामासाठी पत्रे मात्र घेतली जातात, जि. प. सदस्यापेक्षा गावचे सरपंच झालेले बरे अशा संतप्त भावना सोमवारी महिला सदस्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेच्या कामावर समाधानी नसल्याचे मागील आठवड्यात खुद्द अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी सांगितले होते. सोमवारी महिला सदस्यांनीही आपल्या भावना उघडपणे सांगितल्या. शिक्षण समितीच्या बैठकीला आलेल्या सदस्या अधिकारी नसल्याने बैठक तहकूब करुन महिला व बालकल्याणच्या सभापती जयमाला गायकवाड यांच्या दालनात बसल्या होत्या. बार्शीच्या सभापती कौशल्या माळी, सांगोल्याच्या ताई मिसाळ, राणी दिघे, मालती देवकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली. निवडून आल्यानंतर खूप अपेक्षा होत्या, परंतु कामेच होत नाहीत, पद संपत आले, एकही काम झाले नाही, असे त्या म्हणाल्या. शिक्षण समितीचे सदस्य असल्याने किमान शाळांची कामे तरी करता येतील, अशी अपेक्षा होती. तुमची कामे पत्रावर लिहून द्या असे सांगितल्याने लेखी पत्रेही दिली असल्याचे सदस्या म्हणाल्या. जिल्हा परिषद सदस्यापेक्षा गावचे सरपंचपद बरे अशी भावना मालती देवकर यांनी व्यक्त केली. अधिकारी तर भेटले नाहीत, सीईओ मॅडमना भेटण्यासाठी थांबलो असल्याचे त्या म्हणाल्या.
-------------------------------
सीईओंकडे मांडले गाऱ्हाणे
सीईओ श्वेता सिंघल यांना भेटण्यासाठी या सदस्यांनी फोन केल्यानंतर घरीच या असे सांगितले. महिला सदस्यांनी घरी जाऊन आपली गाऱ्हाणी मांडली. आमची पत्रे घेतली परंतु कामेच केली नाहीत, जुन्या शाळा खोल्या इमारती पाडकामाला मान्यता दिली जात नाही, आमची मुदत संपत आली कामे झाली नाहीत?, असे या सदस्यांनी सीईओंना सांगितले. सीईओंनी अधिकाऱ्यांना फोन करुन कामे होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्याचे बार्शीच्या सभापती कौशल्या माळी व राणी दिघे यांनी सांगितले.