शासन आदेशाचा भंग; एक हॉटेल केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:07+5:302021-04-26T04:20:07+5:30
पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना २४ एप्रिल रोजी सायंकाळी गुप्त माहितीद्वारे जवळा येथील शाही दरबार बीयरबार, परमिट रूम ...
पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना २४ एप्रिल रोजी सायंकाळी गुप्त माहितीद्वारे जवळा येथील शाही दरबार बीयरबार, परमिट रूम हे हॉटेल दिवसा ढवळ्या उघडे ठेवून दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे स्वतः पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी घेऊन सायं. ६:३०च्या सुमारास सदर हॉटेलवर अचानक छापा टाकला. त्यावेळी हॉटेल मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे हा दारूची विक्री करीत असताना रंगेहाथ पकडला.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करून शाही दरबार बीयरबार परमिट रूम हे पुढील आदेश येईपर्यंत सील केले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी काळेल यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी हॉटेल मालक इंद्रजीत तानाजीराव घुले (रा.जवळा) व मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे (रा.आलेगाव, ता.सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक यमगर, पोलीस हेडकॉन्स्टेबल बनसोडे, पोलीस नाईक मोहोळकर, पोलीस कॉन्स्टेबल काळेल, पोलीस कॉन्स्टेबल चोरमुले, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी केली आहे. तपास हवालदार विलास बनसोडे करीत आहेत.