सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे
By विलास जळकोटकर | Published: May 5, 2024 10:39 PM2024-05-05T22:39:56+5:302024-05-05T22:40:57+5:30
चालकांविरुद्ध गुन्हे : कारवर झेंडा, फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार
सोलापूर : कारच्या बोनेटवर भाजपाचा झेंडा लावल्याबद्दल तर फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे काँग्रेस व बसपाचा प्रचार करणाऱ्या तिघा चालकांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. चंडक पॉलिटेक्निक कॉलेज, भैय्या चौक आणि जगदंबा चौकात शनिवारी हे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले. महेश मधुकर पाटील (रा. वरळेगाव, ता. द. सोलापूर), रमेश सिरसाट (रा. सोलापूर), रियोजोद्दिन मैनोद्दिन आबादीराजे (रा. उत्तर सदर बझार, लष्कर सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या तिघा चालकांची नावे आहेत.
पहिल्या फिर्यादीत जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता पुरुषोत्तम सुदाम हरीसंगम यांनी म्हटले आहे की, यातील फिर्यादी शनिवारी सायंकाळी ६:१० च्या सुमारास सम्राट चौकाजवळील चंडक पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडवर थांबलेले असताना येथे महेश पाटील या चालकांनी एम. एच. ०१ एसी ९७८४ याने त्याच्या चारचाकी वाहनाच्या बोनेटवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे म्एटले आहे. या प्रकरणी सहा. फौजदार ओव्हळ तपास करीत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अबरार अ. शकूर दिंडोरे हे भैय्या चौकात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना फिरत्या रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार न करता विशिष्ट ठिकाणी थांबून प्रचार करण्याची मूभा असताना रिक्षा चालूस्थितीत असताना नमूद रिक्षाचालक रमेश सिरसाट हा बसपाचे उमेदवार बबलू सिद्राम गायकवाड यांचा रिक्षा चालू असताना माईकद्वारे प्रचार करताना आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
तिसरी घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास जगदंबा चौकात आढळून आली. येथे फिर्यादी पोलीस नाईक सागर सुधाकर सरतापे हे कर्तव्य बजावत असताना रियोजोद्दिन आबादीराजे हा रिक्षाचालक काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा बोड लावून रिक्षा चालू स्थितीत असताना रिक्षातील माईकवरुन प्रचार करताना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास हवालदार कंचे करीत आहेत.
काय सांगतो नियम
निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ अन्वये ध्वनी क्षेपनाच्या वापरावरील निर्बंध घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी दिले आहेत. त्यातील क्रमांक ३ मध्ये दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा, असे आदेशात म्हटले आहे.