वाहतूक नियमांचे उल्लंघन; खाकीचा धाक आहेच मग वाहनांवर ‘पोलीस’ हवं कशाला ?
By Appasaheb.patil | Published: September 6, 2022 10:38 AM2022-09-06T10:38:28+5:302022-09-06T10:38:34+5:30
चारचाकी वाहनात दर्शनी भागात ठेवला जातोय बोर्ड अन् कॅप : दुचाकीवर झळकतो लोगो
सोलापूर : मुळात खात्याने दिलेली वर्दी हीच पोलिसांची सगळ्यात मोठी ओळख आहे. कर्तव्यावर नसताना ते सामान्य नागरिकच असतात. मात्र, तरीही स्वत:चा वेगळा रुबाब दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर पोलीस असे लिहिलेले असते. याच सर्वाधिक दुचाकीवर पोलीस आढळून आले, शिवाय खात्याचाही लोगो अनेक गाड्यांवर असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.
मोटार वाहन कायद्याप्रमाणे खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर पोलीस असे लिहिणे कायद्याने दंडात्मक आहे. खासगी वाहनांवर खात्यातील कर्मचाऱ्यांनी लिहिणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही पोलीस अधिकारी, कर्मचारी सर्रास या नियमाची पायमल्ली करतात. वाहतूक पोलीसही जाणीवपूर्वक स्वत:च्या खासगी वाहनांवर पोलीस लिहितात. खात्याचा लोगोही वापरतात. सर्वसामान्यांच्या गाडीवर नियमानुसार कारवाई करणारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पोलिसांच्या गाड्यांवर कधी कारवाई करणार याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
-------------
कॅप अन् पोलीस बोर्ड गाडीसमोर...
आता तर काही अधिकारी आपल्या चारचाकी वाहनात खात्याने दिलेली पी कॅप दर्शनी भागावर ठेवतात, जेणेकरून टोल नाका, इतर ठिकाणी प्रवासात अडचण येऊ नये, विशेष सवलत मिळावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. ही कृतीसुद्धा नियमात बसणारी नसल्याचे अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
-------------
‘लोकमत’ला काय आढळले?
- - अधीक्षक कार्यालय : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग व्यवस्था आहे. या पार्किंगमधील अनेक गाड्यांवर पोलीस लिहिलेले असते, शिवाय पोलिसांचा लोगोही असतो. अनेक चारचाकी खासगी वाहनात समोरील काचेजवळ पोलीस असलेला बोर्ड आढळून येतो.
- -पोलीस आयुक्तालय : शहर पोलीस आयुक्तालयासमोर असलेल्या टाकीजवळ पोलिसांची वाहने पार्किंग केली जातात. या पार्किंगमध्ये अनेक दुचाकी वाहनांवर पोलीस लिहिल्याचे सर्रास पाहावयास मिळते. तेथेही कारवाई होत नाही.
- -पोलीस ठाणे : ग्रामीण असो वा शहर पोलीस ठाणे परिसरात वाहने ठेवलेली असतात. या खासगी वाहनांवर पोलीस लिहिले जाते. खात्याचा लोगोही वापरला जातो.
- -तालुका ठाणे : अनेक पोलीस कर्मचारी दुचाकीवर ठळक अक्षरात पोलीस लिहितात. शिवाय खासगी चारचाकी वाहनांवरही पोलीस लिहितात. एवढेच नव्हे तर अनेकांच्या गाड्यांवर पोलीस असल्याचे पहावयास मिळते.
-----------
आठ महिन्यांत एकाही वाहनावर कारवाई नाही
मोटार वाहन कायद्याप्रमाणे दुचाकी व अन्य खासगी वाहनांवर पोलीस वा अन्य काही लिहिणे दंडनीय गुन्हा आहे. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. मागील आठ महिन्यांत एकाही वाहनावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
----------------
नियम सर्वांना सारखाच
मोटार वाहन कायद्यातील तरतुदी अतिशय स्पष्ट आहेत. ज्या वाहनांची नोंदणी ठराविक कामासाठी झाली, त्यावरच असे लिहिता येते. नियमबाह्य लिहिणे चुकीचे आहे. शिवाय खासगी वाहनांवर पोलीस लिहिणे अत्यंत चुकीचे आहे. योग्य ती कारवाई होईल.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर