भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:25 AM2019-07-13T05:25:48+5:302019-07-13T05:26:03+5:30
आषाढी एकादशी सोहळा : मंदिर समितीचे नियोजन कोलमडले
सचिन कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक दर्शन रांगेत थांबलेले असताना अतिमहत्वाच्या व्यक्तींबरोबर आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत व्हीआपी दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी व्हीआयपी दर्शनासाठी सोळखांबी व चौखांबीमध्ये गर्दी केली़ यामुळे मंदिर समितीने शासकीय महापूजेत बदल करुन वेळ वाचवण्याच्या प्रयत्नावर पाणी पडले. अनेक कार्यकर्त्यांनी विठ्ठलाजवळ फोटो काढत वेळ घालविला़ शेकडो किलो मीटरचे अंतर पार करुन पायी चालत आलेला भाविक विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने दर्शन रांगेत तटकाळत थांबलेले दिसून आले.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख नऊ पालख्या आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपान महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गजानन महाराज, संत निळोबाराय महाराज यांचा समावेश आहे़ आषाढीसाठी या पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरपुरात मुक्कामी आहेत.
एकादशी सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत थांबतात. ही दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली होती़ दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी किमान १६ ते २४ तासाचा कालावधी लागत होता. या १६ तासात भाविक आरोग्य व अन्य समस्यांशी सामना देत दर्शन रांगेतूनच दर्शन घेतात़
दर्शनरांग सुरू होण्यास वेळ
मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले व कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी शासकीय महापूजेमध्ये किरकोल बदल करुन कमी वेळत पूजा संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य कर्तव्य बजावले नाही. यामुळे शासकीय महापूजेदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश केला. यामुळे दर्शन रांग सुरु होण्यास विलंब झाला.