व्हिडीओ क्लिप प्रकरण : श्रीकांत देशमुख, महिलेचा फोन बंद; सांगोल्यातही चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:23 AM2022-07-14T11:23:47+5:302022-07-14T11:23:58+5:30
देशमुख यांच्या जागी भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असेल याबद्दल चर्चा
सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि एका महिलेचा बेडरूममधील व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. देशमुख आणि महिलेचा फोन बंद असल्याचे बुधवारी दिसून आले. दरम्यान, देशमुख यांच्या जागी भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असेल याबद्दल चर्चा आहे.
देशमुख आणि महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली. यादरम्यान देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल करणे हा विराेधकांचा कट असल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. देशमुखांनी संबंधित महिलेवर गंभीर आरोप केले. यासंदर्भात महिलेची बाजू जाणून घेण्यासाठी महिलेला फोन केला असता मंगळवारी आणि बुधवारी फोन बंदच असल्याचे आढळून आले. भाजपचे अनेक कार्यकर्ते बुधवारी देशमुखांना फोन करीत होते. देशमुख आणि त्यांचे पी.ए. यांचेही फोन बंद आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. संजय राठोड, धनंजय मुंडे प्रकरणावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ट्रोल केले होते. आता देशमुख प्रकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली. सोशल मीडियावर भाजपच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपमधून देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांना काढण्यात आले. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.
सांगोल्याची बदनामी झाल्याची चर्चा
देशमुख प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटत आहे. सांगोल्याचे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्यासमोर राज्यातील नेते नतमस्तक व्हायचे. स्व. गणपतराव देशमुख यांच्यामुळे तालुक्याची उंची वाढली होती. महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑडिओ क्लीपमुळे तालुका पुन्हा चर्चेत आला होता. काही लोकांनी या क्लीपचे कोतुक केले होते तर काही लोकांनी टीका केली होती. श्रीकांत देशमुख यांच्या प्रकरणामुळे तालुक्याची बदनामी झाल्याचा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.