विश्व मराठी संमेलन २८ जानेवारीपासून! नऊ अध्यक्षांचे मंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:58 AM2021-01-25T02:58:14+5:302021-01-25T02:58:23+5:30
संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत
सोलापूर : बृहन्महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या संमेलनासाठी नऊ अध्यक्षांचे मंडळ असून, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असतील.
रविवारी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाच्या तारखांची घोषणा करण्यात आली. या संमेलनाद्वारे बारा कोटी मराठी भाषकांना जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन असेल, असे संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.
या संमेलनामध्ये जगभरातील ३२ देशांतून, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि १५० हून अधिक संस्था, पाचशेहून अधिक वाचनालये आणि हजारहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग असेल, तसेच साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककलेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कवी कट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडीलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
संमेलनामध्ये साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककलेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कवी कट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडीलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.