'बोम्मारिल्लू'तून परंपरा अन् भावविश्वाचे दर्शन..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:55 PM2019-11-01T12:55:00+5:302019-11-01T12:56:54+5:30
पूर्व भागात परंपरेचे जतन करत घरोघरी मांडणी : सोलापूरकरांनी दिली कलेला दाद; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी
यशवंत सादूल
सोलापूर : यंदाच्या दिवाळीत शहरातील पद्मशाली समाजासह सर्व तेलुगू भाषिकांनी मोठ्या उत्साहात घरोघरी‘बोम्मारिल्लू’ची सजावट केली आहे. बोम्मा म्हणजेच बाहुली, ईल्लू म्हणजे घर. तेलुगू भाषिक समाज परंपरा जतन करत हा उत्सव साजरा करतात. बोम्मारिल्लू म्हणजे मुलांच्या कल्पनेतील भावविश्वाचे जाहीर प्रकटीकरण असते. संस्कृतीचे दर्शन घडवित आपल्या भावी संसाराचे धडे यातून मुले गिरवत असतात.
त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी घरातील सर्व वडीलधारी मंडळी प्रोत्साहन देतात. त्यांच्या सजावटीत प्रत्यक्ष सहभागी होतात़ दीपावली पाडवा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत सर्वत्र या बोम्मारिल्लूची लगबग असते. जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण वस्तूंची सजावट करण्यात येते. बोम्मारिल्लूत तयार करण्यात आलेल्या फराळाची देवाण घेवाण होते़ बाहुला बाहुलीचा विवाह ठरविण्यात येतो. वधूपक्ष, वरपक्ष असे दोन गट तयार होतात. ताट वाटी वाजवीत बाहुलीची मिरवणूक काढण्यात येते. शुभमंगल सावधान होऊन अक्षता सोहळा होतो. भोजनावळीने ‘बोम्मारिल्लू’ची सांगता होते.
भावी संसाराचे धडे गिरविण्यासोबत त्यांची कल्पनाशक्ती विकसित होत असते. विविध वस्तूंची आकर्षक मांडणी करताना अनेक मुलींनी सामाजिक संदेश देणारे मुली वाचवा, झाडे लावा झाडे जगवा अशी सजावट केली आहे.
सध्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी असलेल्या व सध्या पुण्यात जॉब करत असलेल्या अनेक मुलींनी चांद्रयान, संगणकीय प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. भारतीय सण-उत्सव, रुढी-परंपरा याचे दर्शन बाहुलीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सर्वत्र प्रकर्षाने दिसून आले़ स्मार्ट सिटी सोलापूर, शहरातील प्रसिद्ध ठिकाणे, वारसा स्थळे, यासोबत त्यांच्या कल्पनेतील रस्ते, भाजी मंडई, विमानतळ, बस पोर्टल यांची सविस्तर मांडणी केली आहे़ हे बोम्मारिल्लू पाहण्यासाठी आप्तस्वकीयासोबत सोलापूरकर नागरिक तेलुगू संस्कृती उत्सुकतेने पाहण्यासाठी पूर्व भागात सहकुटुंब येत आहेत़
घरकुलाचे वेगळेपण राहण्यासाठी जणू स्पर्धा
- बोम्मारिल्लूतील बाहुला-बाहुली भोवती सर्व साहित्यांची मांडणी केली जाते़ गृहोपयोगी सर्व वस्तूंच्या मांडणीसोबत त्यांच्या कल्पनेतील फर्निचरसुद्धा ठेवण्यात येतात. दैनंदिन जीवनातील, व्यवहारातील लागणाºया जास्तीत जास्त वस्तूंचा संग्रह करीत त्याची मांडणी करतात. सगळ्यापेक्षा आपल्या घरकुलाचे वेगळेपण कसे राहील यासाठी धडपडणारी मुले पूर्व भागात सर्वत्र दिसून येतात. टीव्ही, सोशल मीडियाचा मुलांवर दुष्परिणाम होऊन मुले त्याच्या आहारी जात आहेत, अशी सर्वसामान्यांची ओरड असताना पूर्व भागातील मुले ते सर्व विसरून बोम्मारिल्लूतून संस्कृतीचे जतन करीत आहेत. बोम्मारिल्लूतून ठेवण्यात येणाºया लाकडी बाहुलीचे जतन करीत मुलगी जेव्हा सासरी जाते त्यावेळेस तिला आंदण म्हणून ती बाहुली देवून निरोप देण्याची प्रथा आजही रुढ आहे.
स्मार्ट सिटी साकारले..
- अक्कलकोट रोड, मुद्रा सनसिटी येथील गोविंद गाजूल यांच्या कन्या पल्लवी लकापती व वंदना शेगूर यांनी बोम्मारिल्लूनिमित्त माहेरी येऊन सजावट केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून रोजच्या जीवनातील गृहोपयोगी वस्तूंची कल्पकतेने सजावट केली आहे. यामध्ये आई छाया, मुली अवनी व अन्वी तसेच भाऊ प्रवीण यांचाही सक्रिय सहभाग होता. टाकाऊ वस्तूंपासून संपूर्ण सोलापूर शहराचे चित्र उभे केले असून, यामध्ये प्रमुख बाजारपेठ, पेट्रोलपंप, मॉल्स, ज्वेलरी, पेपर विक्रेत्यांची दुकाने, मैदाने, हॉटेल्स, बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकाचे सादरीकरण करण्यात आले आहे. घरातील एका मोठ्या खोलीचा यासाठी वापर करण्यात आला आहे. यातून बदलत्या शहराचे दर्शन घडवित ‘स्मार्ट सोलापूर’ दाखविण्यात आला.