पंढरपूरातील विठ्ठल मूर्ती प्रतिष्ठापनेला ५११ वर्षे पूर्ण, आनंदोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:11 AM2017-11-04T11:11:59+5:302017-11-04T11:13:23+5:30
प्रभू पुजारी
पंढरपूर दि ४ : पैठण येथील संत श्री एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटकातील विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्याकडून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाची मूर्ती शके १४२८ म्हणजे इ़ स. १५०६ साली पुन्हा पंढरपूरला आणली़ त्यानंतर संत भानुदास महाराज यांनीच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घटनेला ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी (शके १९३९ म्हणजे इ. स. २०१७ कार्तिकी एकादशीला) ५११ वर्षे पूर्ण झाली आहेत़
‘नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!
विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !’
पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो, त्याचे सर्व श्रेय जाते ते संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनाच़
संत भानुदास महाराज यांचा जन्म इ. स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करून आशीर्वाद प्राप्त केले. शिवाय ते विठ्ठलभक्तही होते़ प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्यांचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. मात्र त्यांची त्याकाळी एक वेगळी ओळख निर्माण झाली ती एका ऐतिहासिक घटनेमुळे.
विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय पंढरीस आले होते़ श्री विठ्ठल मूर्तीस आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठापना करावे, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तसे केलेही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकºयांची दाटी होऊ लागली़ परंतु ज्यांच्या दर्शनासाठी आपण येथे आलो, त्या विठ्ठलाची मूर्ती पंढरीत नसल्याचे पाहून वारकरी व्याकूळ झाले़ विठ्ठलभक्तांची ही व्याकुळता पाहून संत भानुदास महाराजांनी सर्व वारकरी बांधवांना आश्वासन दिले की, मी विठ्ठल मूर्तीस पुन्हा पंढरीत आणीन.
काही दिवसांनी संत भानुदास महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी विजयनगरला गेले़ मध्यरात्री विठ्ठलासमोर येऊन उभे राहून दर्शन घेत होते, तेव्हा सद्भक्तासाठी विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार संत भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला़ संत भानुदास महाराज तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तेथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. ही बातमी राजापर्यंत पोहोचली.
जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र त्या चोराचा शोध घेऊ लागले़ पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी संत भानुदास महाराज स्नान करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच चोर असावा असे गृहीत धरून सैनिकाने संत भानुदास महाराजांना बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला़़़
‘जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा !’ ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार होते त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाचा थरकाप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान सद्भक्त असावा हे त्यांच्या लक्षात आले.
-----------------
मूर्तीची रथातून मिरवणूक
राजा कृष्णदेवराय यांनी संत भानुदास यांना श्री विठ्ठल मूर्ती घेऊन पंढरीस जाण्यास सांगितले़ पंढरी जवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकºयांनी श्री विठ्ठल मूर्तीची रथातून मिरवणूक काढली़ तो दिवस होता कार्तिकी शुद्ध एकादशी इ. स. १५०६ सालचा. या घटनेला यंदाच्या कार्तिकी एकादशीला ५११ वर्षे पूर्ण झाली़ संत भानुदास महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्यांची समाधी श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये बांधण्यात आली आहे़