विठ्ठलाच्या उत्पन्नात चौपट वाढ
By admin | Published: July 12, 2014 12:15 AM2014-07-12T00:15:47+5:302014-07-12T00:15:47+5:30
बडवे-उत्पातांशिवाय पहिलीच वारी: गर्दी कमी असूनही वाढले दान
पंढरपूर: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बडवेमुक्त झाल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा चौपट वाढ झाली असून यंदा १८ लाख ७६ हजार ३५८ रूपयांचे दान विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर गोळा झाले आहे. गतवर्षी ६ लाख ४५ हजार २०० रूपये गोळा झाले होते.
प्रत्येक वर्षी आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांबरोबर लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे पंढरपूर शहराबरोबरच इतर गावातील व्यापारी माल खरेदी लवकर येतात. यंदाच्या वर्षीही असाच प्रकार घडला. परंतु आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांसह भाविकांची गर्दी कमी असल्याचे जाणवत होते. यामुळे सर्व चिंतीत पडले. दशमीच्या दिवशी सकाळी काहीच गर्दी नव्हती. परंतु त्याच दिवशी सायंकाळी भाविकांची गर्दी वाढली. एकादशीदिवशी पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरच जादा गर्दी होती. त्यानंतर द्वादशीदिवशी पंढरपूर मोकळे झाले. यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षीत असा व्यवसाय झाला नाही.
असे असले तरी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नावर याचा काहीच परिणाम जाणवला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे-उत्पातांना मंदिरातून बाहेर काढल्याने विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर थेट पडणारी रक्कम मंदिर समितीच्या उत्पन्नात जमा झाली आहे.
यामुळे यंदाच्या वर्षी गतवर्षीच्या तुलनेने मंदिर समितीला जादा उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी आषाढ पंधरवड्यात विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दानासाठी बडवे-उत्पातांनी ६ लाख ३२ हजार २०० रूपयांना लिलाव घेतला होता. यामुळे एवढीच रक्कम मंदिर समितीला मिळाली होती. परंतु यंदाच्या वर्षी विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दान थेट मंदिर समितीला मिळाले आहे. यामुळे मंदिर समितीला २० लाख २७ हजार ३५८ रूपये उत्पन्न मिळाले.
--------------------
बडवे-उत्पातांविना पहिलीच वारी
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये यंदाच्या वर्षी बडवे-उत्पात मुक्त आषाढी झाली आहे. या आषाढीमध्ये दोन्ही समाजाकडून आणल्या जात असलेल्या यजमानांचा त्रास भाविकांना सहन करावा लागला नाही. त्याचबरोबर विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील बडवे-उत्पात मंडळींकडून मागण्यात येणारी दक्षिणा बंद झाल्याने दर्शनरांग सुरळीत व व्यवस्थित पुढे जात होती असे सांगण्यात आले़
------------------
यंदाच्या वर्षी दुष्काळामुळे भाविकांच्या संख्येत घट असली तरी मंदिर समितीच्या उत्पन्नात काहीही फरक जाणवला नसून याउलट मंदिर समितीला जास्तच उत्पन्न मिळाले आहे.
- संजय तेली कार्यकारी अधिकारी,
विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती