विठुमाऊलीच सर्वश्रेष्ठ न्यायाधीश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:27 PM2019-07-08T18:27:08+5:302019-07-08T18:32:57+5:30
खरोखरी विठुमाऊलीच सर्वश्रेष्ठ न्यायाधीश हेच खरे !
मागील सोमवारच्या ‘बेवफाई की सजा : सजा-ए-मौत’ या दुनियादारीतील कोर्ट स्टोरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक वाचकांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रतिक्रिया कळविल्या. खरे पाहता आजच्या अंकामध्ये ‘बेवफाई की सजा-ए-मौत खुदके हातोंसे’ ही कोर्ट स्टोरी प्रसिद्ध होणार होती. ती आता पुढच्या सोमवारी. सध्या सर्व ठिकाणी वारी व आषाढी एकादशीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर वरील लेख प्रसिद्ध करण्याऐवजी वारीत सहभागी झालेल्या विठुमाऊलीवर अत्यंत श्रद्धा असणाºया श्रद्धावान वारकºयावर खुनाचा आरोप करण्यात आला,परंतु वारीतील सहभागामुळे तो आरोप कसा खोटा ठरला परंतु त्याच्या मुलाला नंतर कशी शिक्षा झाली याबद्दलची आजची ‘दुनियादारी’ तील कोर्ट स्टोरी.
त्याचे असे झाले, त्या वारकºयाने व त्याच्या मुलाने शेजारील शेतकºयाचा बांधाच्या कारणावरुन खून केला या आरोपावरुन न्यायालयात खटला दाखल झाला होता. शेजारील शेतकरी शेतात झोपलेला असताना त्याला या दोघांनी काठी व कुºहाडीने मारहाण करून जखमी केले व जखमीस औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याचा मरणपूर्व जबाब घेण्यात आला. मृत्यूपूर्व जबाबात त्याने त्या वारकºयाच्या मुलाने कुºहाडीने व वारकºयाने काठीने मारहाण केली असे सांगितले होते. मरणपूर्व जबाबानंतर दोन दिवसानंतर जखमीचा मृत्यू झाला होता. वास्तविक पाहता घटना घडली त्यावेळी तो वारकरी वारीमध्ये होता. माऊलींच्या वारीमध्ये दरवर्षीप्रमाणे आळंदीपासूनच तो सामील झाला होता. तो घटनास्थळी नव्हता. जो काही उद्योग झाला होता तो त्याच्या मुलाकडून झाला होता, परंतु त्या शेजारील जखमी शेतकºयाने मृत्यूपूर्व जबाब देताना या वारकरी वडिलांना खोटेपणाने गुंतवले होते.
दोघांविरुद्ध पोलिसांनीन्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. मृत्यूपूर्व जबाबात त्या वारकºयाचे नाव असल्यामुळे केसमधून सुटण्याची शक्यता फार कमी होती. मृत्यूपूर्व जबाबाचा कायदा हा मृत्यूशय्येवर असलेला माणूस खोटे बोलत नाही. सत्य हे त्याच्या ओठावर नाचत असते या संकल्पनेवर आधारित आहे. मृत्यूपूर्व जबाबामुळे अनेक निष्पापांना शिक्षा झालेली मी बघितले आहे. हा अनुभव अनेक खटल्यात आलेला आहे. मी त्या वारकºयास स्पष्टपणे सांगितले की, माऊली तुमची केस फार गंभीर आहे. तुमचे नाव मृत्यूपूर्व जबाबात आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षा होण्याची फार मोठी शक्यता आहे, तर तो म्हणाला आबासाहेब जे काय होणार आहे ते माझी विठुमाऊलीच करणार आहेत. विठुमाऊलीची इच्छा असेल मी जेलमध्ये जावे तर आनंदाने मी जेलमध्ये जाईन. त्याची इच्छा मला सोडायची असेल तर आनंदाने घरी जाईन. सुदैवाने ते ज्या दिंडीत होते त्या दिंडीच्या लिस्टमध्ये त्यांचे नाव होते. त्यांनी मोबाईलवरुन घरच्यांना फोन केला होता.
मृत्यूपूर्व जबाबात त्यांनी काठीने मारले असा आरोप होता, परंतु शवविच्छेदन अहवालात असलेल्या जखमा कापी व हत्याराने झाल्या आहेत असे नमूद होते. एकही जखम काठीने झालेली नव्हती. आम्ही न्यायालयात दिंडीतील यादी, दिंडीचा प्रवास, त्यास पुष्टी देणाºया मोबाईल टॉवरचे लोकेशन दाखवणारा कागदोपत्री पुरावा न्यायालयासमोर हजर केला. त्या पुराव्यावरुन स्पष्टपणे दिसून येत होते की, आमचा आरोपी घटनास्थळी नव्हता. दिंडीत होता. शवविच्छेदन अहवालदेखील दाखवत होता की, मयताच्या अंगावर काठीच्या जखमा नाहीत. यावरुन स्पष्टपणे दिसत होते की, आमच्या वारकरी आरोपीस खोटेपणाने गुंतविले आहे. मनुष्य मरतानादेखील किती खोटे बोलू शकतो याचा धडधडीत पुरावा आम्ही सादर केला. त्यावरुन मृत्यूपूर्व जबाब खोटा ठरला. त्या पिता-पुत्रांची निर्दोष मुक्तता झाली. सायंकाळी दोघेही नातेवाईकांसहीत आॅफिसला आले. तो वारकरी म्हणाला, बघा आबासाहेब केली की नाही माझ्या विठुमाऊलींनी माझी सुटका. तो मुलगा दात विचकत म्हणाला माझी बी केली की सुटका. मी त्यास रागाने म्हणालो, वडिलांच्या वारीमुळे तुझी येरवडा वारी चुकली. पण लक्षात ठेव विठुमाऊली फार श्रेष्ठ न्यायाधीश आहे. विठुमाऊली जशी निष्पापांना न्याय देते तशी गुन्हेगारांना शिक्षा देखील देते.
दोन वर्षांतच त्या मुलावर दुसरा एक खुनाचा खटला दाखल झाला. त्या खटल्यात तो नव्हता, परंतु त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली. मी त्याच्या वडिलांना म्हणालो वरच्या कोर्टात अपील करु. तो वारकरी वडील म्हणाला, आबासाहेब, पूर्वीच्या खटल्यातून विठुमाऊलीनेच मला सोडवले आणि विठुमाऊलीनेच या खटल्यात त्याला शिक्षा केली जेलमध्ये पाठवले, सर्व विठुमाऊलीचींच इच्छा. विठुमाऊलीने दिलेला निकाल मला मान्य आहे. अपील करायला नको असे सांगून तो आॅफिसमधून निघून गेला...! खरोखरी विठुमाऊलीच सर्वश्रेष्ठ न्यायाधीश हेच खरे !
-अॅड. धनंजय माने
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)