विठुरायाला शीतलतेसाठी चंदनउटी पूजेला सुरुवात; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण साजरा

By रवींद्र देशमुख | Published: April 9, 2024 07:13 PM2024-04-09T19:13:41+5:302024-04-09T19:13:55+5:30

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते.

Vithuraya begins Chandanooti Puja for cooling; Gudhipadwa festival celebrated in Vitthal Rukmini temple | विठुरायाला शीतलतेसाठी चंदनउटी पूजेला सुरुवात; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण साजरा

विठुरायाला शीतलतेसाठी चंदनउटी पूजेला सुरुवात; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण साजरा

पंढरपूर : ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवारपासून सुरुवात झाली असल्याचे श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील या पद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. प्रतिवर्षी या पूजा भाविकांना देणगी मूल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येतात. तथापि, गर्भगृह संवर्धनाचे काम सुरू असल्याने, पदस्पर्श दर्शन बंद आहे. त्यामुळे पदस्पर्श दर्शन सुरू होईपर्यंत भाविकांच्या हस्ते पूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चंदनउटी पूजा मंदिर समितीमार्फत करण्यात येत आहे.

गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला नवीन महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंदिरात सकाळी ८ वाजता मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख संजय कोकीळ, सहायक विभाग प्रमुख प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपूर या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. पुजारी समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रीं चे महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरुवात करण्यात येत असून, दुपारी पोशाखा वेळी श्रींस अलंकार परिधान करण्यात आले.
 

रात्री ११ वाजेपर्यंत मुखदर्शन
श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या, गुढीपाडवा सणाला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन, या दिवशी पहाटे ५ ते रा. ११ पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

Web Title: Vithuraya begins Chandanooti Puja for cooling; Gudhipadwa festival celebrated in Vitthal Rukmini temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.