पंढरपुरातील विठुरायाला भगवा पोशाख; केशरी फुलांनी सजलं गाभारा, नामदेव पायरी अन् चौखांबी
By Appasaheb.patil | Published: January 22, 2024 04:43 PM2024-01-22T16:43:48+5:302024-01-22T16:45:59+5:30
अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सोलापूर : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने सोमवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर केशरी फुलांनी सजले आहे. मंदिरात सर्वत्र केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर विठुरायाला भगवा पोशाख घालण्यात आला आहे. या पोशाखात विठुरायाचं सावळं रुप अधिकच खुलून दिसत आहे. अयोध्या नगरीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
विठ्ठलाच्या दर्शनानंतर अनेक भाविकांनी जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय ' बजरंग बली की जय' अशा जय घोषणा केल्यानं परिसर दणाणून गेला. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलात नटली आहे. मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. याशिवाय संत नामदेव पायरी जवळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सिता आणि हनुमान यांच्या पानाफुलांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला केशरी रंगाच्या फुलांची अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत राेषणाईमुळे मंदिर परिसर उजळले आहे.