विठ्ठल कारखान्याची ६६ हजार ६४६ पोती साखर चोरून विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:01+5:302021-09-27T04:24:01+5:30
पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड ...
पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड केला आहे.
पुढे पाटील म्हणाले, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला २०१८-१९, १९-२०, २०-२१ या तीन वर्षात कोणकोणत्या बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे? किती कर्ज उचलले आहे त्याचा वापर कुठे कुठे केला आहे? कोणकोणत्या संचालक व त्यांच्या नातेवाइकांकडे किती कर्ज आहे. त्या कर्जाच्या वसुलीबाबत काय कारवाई केली. चार वर्षांमध्ये तोडणी वाहतूकदारांची किती देय थकले आहे. ते देय कधी देणार, यासाठी कुठून पैसे उपलब्ध होणार? कर्मचाऱ्यांची किती महिन्याचे पगार करणे बाकी आहे, ती रक्कम किती आहे. पगार देणेबाबत काय तरतूद केली आहे?
३१ मार्च २० व ३१ मार्च २०२१ अखेरच्या हिशेबाचे ताळेबंद पत्रक व १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीच्या नफा-तोटा पत्रक यावर सविस्तरपणे माहिती देण्यात यावी. या कालावधीत तोटा झाला असल्यास कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या तोटाच या रकमेचा बोजा सोडून द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात यावा.
२०१९-२० या आर्थिक वर्षात किती भंगार विक्री केले. किती दराने विक्री केली व कोणास केली आहे. या भंगार विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, त्यामुळे सविस्तर चौकशी झाल्याशिवाय नोंद घेऊन मंजुरी देऊ नये, असा ठराव करावा.
यासह संस्थेने सन २०१९-२० व २०२०-२१ यापूर्वी बाहेरून किती निधी उभारला आहे, त्याची परतफेड केली आहे का? याची सविस्तर माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी.
त्याचबरोबर भ्रष्ट कारभार करणाऱ्या चेअरमन, व्हाइस चेअरमनसह संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे.
:: कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ::::
विठ्ठल कारखान्यास १११ कोटी नऊ लाख ४४४० रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यातून ऊसबिलाची ६२ कोटी २२ लाख ७१,३५० रुपये पूर्ण दिल्यानंतरदेखील ४८ कोटी ८६ लाख ३३,०९० रुपये शिल्लक राहत आहेत. तीन लाख ३५४७ मे. टन ६५० प्रतितोडणीप्रमाणे वाहतुकीचा खर्च १९ कोटी ७३ लाख ५५५० रुपये द्यायला पाहिजे होता. तरीदेखील अंदाजे ४८ कोटी ८६ लाख ३३०९० रुपये पैकी १९ कोटी ७३ लाख ५५५० दिले तरी २९ कोटी १३ लाख २७५४० रुपये शिल्लक राहतात. कर्मचारी पगार महिना एक कोटीप्रमाणे धरून १२ कोटी रुपये शिल्लक रक्कमेतून अदा करायला पाहिजे होता. शिल्लक रुपयांपैकी १२ कोटी रुपये पगार देऊनही १७ कोटी १३ लाख २७ हजार ५४० रुपये शिल्लक राहतात. वरील सर्व बाबींचा विचार करता कारखाना तोट्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.
............