पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात २५ हजार भाविकांनी घेतला मठ्ठा, मसाले भाताचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:18 PM2019-04-16T14:18:07+5:302019-04-16T14:20:58+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला श्रध्देने केलेल्या दानातील पैशाचा सदुपयोग करत मंदिर समितीने चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सोमवारी ५०० किलो भाताची खिचडी आणि हजारो लिटर मठ्ठा वाटप केला.
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला श्रध्देने केलेल्या दानातील पैशाचा सदुपयोग करत मंदिर समितीने चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सोमवारी ५०० किलो भाताची खिचडी आणि हजारो लिटर मठ्ठा वाटप केला. मंदिर समितीच्या या उपक्रमामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. चैत्री वारी असल्याने भाविकांना शाबूची खिचडी व ताक वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
श्री विठ्ठलावरील श्रध्देमुळे राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत़ यातील अनेक भाविक दिंंड्यासह शेकडो कि. मी. अंतराहून पायी चालत आले आहेत़ काही भाविक खासगी वाहनाने, एस. टी. बसने व रेल्वेने आले आहेत़ पंढरीत आलेल्या प्रत्येक भाविकाची विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा असते. ज्यांना जमेल ते विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतात. अन्य भाविक मुख दर्शन, नामदेव पायरी दर्शन व कळसाचे दर्शन घेऊन माघारी जातात.
विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून दूरवर गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत जाते़ यंदा सहा पत्राशेडची उभारणी करून भाविकांची सोय केली आहे़ दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांची पाणी व अन्नाची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने यावर्षी दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांसाठी नवमी दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रांगेतील भाविकांना पत्राशेड येथे भाताची खिचडी व सरडा भवन येथे थंडगार मठा देण्याची सोय केली होती़ याचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले़ अंदाजे ५०० किलो भाताची खिचडी व ५५० लिटर दुधापासून हजारो लिटर मठ्ठा तयार करून तो भाविकांना वाटप करण्यात आला.
एकादशीनिमित्त भाविकांना मिळणार खिचडी अन् ताक
- सोमवारी दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने मसाला भात आणि मठ्ठा वाटप करण्यात आला होता, मात्र मंगळवारी एकादशी असल्याने भाविक पांडुरंगाच्या नावाने उपवास करतात़ त्यामुळे दिवसभर भाविक शाबूची खिचडीच खातात़ त्यामुळे मंदिर समितीनेही आज एकादशीनिमित्त दर्शन रांगेतील भाविकांसाठी शाबूची खिचडी व ताक वाटप करणार असल्याचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.