कार्तिकी यात्रेत पोलिसांच्या रूपात विठ्ठल धावला; १५७ भाविकांची झाली त्यांच्या नातेवाईकांशी भेट
By दिपक दुपारगुडे | Published: November 28, 2023 05:44 PM2023-11-28T17:44:54+5:302023-11-28T17:46:04+5:30
श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या मदती पोलिस प्रशासनाच्यावतीने तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पना राबविण्यात आली.
सोलापूर /पंढरपूर : कार्तिकी यात्रेत पंढरपुरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीत हरवलेल्या १५७ लहान, वृध्द भाविकांना त्यांच्या नातेवाइकांशी भेट घालून देण्याचे काम तीर्थक्षेत्र पोलिसिंगमुळे शक्य झाले आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या मदती पोलिस प्रशासनाच्यावतीने तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पना राबविण्यात आली. चार ठिकाणी स्वागत कक्ष करण्यात आले. त्या कक्षात माहिती पुस्तिका ठेवून त्यामधील मठ धर्मशाळा मंदिरे व राहण्याची ठिकाणे रस्ते हॉस्पिटल, पार्किंगची व्यवस्था याबाबत माहिती भाविकांना देण्यात आली. या कक्षामध्ये शहरातील महत्त्वाच्या संस्थांची रुग्णालयाची, शासकीय कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या फोन नंबरची यादी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हजारो भाविकांना त्याची मदत झाली.
या उपक्रमामध्ये स्वेरी कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, सिंहगड कॉलेज येथील विद्यार्थ्यांना नि पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सहभाग घेतला. या स्वागत कक्षामध्ये प्राथमिक उपचारासाठी आरोग्य साहित्यदेखील ठेवण्यात आले हाेते. स्पीकरद्वारे माहिती पुकारून नातेवाइकांना हरवलेल्या व्यक्तींची माहिती पोहोच करण्याचे काम होत होते. यामुळे हरविलेले भाविक स्वागत कक्षाकडे येत होते. या माध्यमातून १५७ हरविलेल्या भाविकांची भेट घालून देण्यात आले. हरवलेल्या भाविक लहान मुले यांची नातेवाइकांची भेट झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदाचा क्षण हा द्विगुणित करणारा होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र पोलिसिंग संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे काम पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलिस उपनिरीक्षक सारिका शिंदे, पोलिस हवालदार सिरमा गोडसे, ज्ञानेश्वर सातव, अविनाश रोडगे, पोलिस नाईक विनोद काळे, नीलेश कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे, विद्या पवार यांनी केली आहे.