प्रक्षाळ पूजेने गेला विठ्ठल-रुक्मिणीचा शीण
By Admin | Published: July 17, 2014 12:54 AM2014-07-17T00:54:32+5:302014-07-17T00:54:32+5:30
विठ्ठल मंदिर: पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
पंढरपूर : आषाढी यात्रेतील देवाचा शिणवटा घालवण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली. पाच हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थित सावळ्या पांडुरंगाचे रुप डोळ्यांत साठवत महाप्रसादाचा लाभ घेतला.
गेल्या पंधरा दिवसांपासून आषाढीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भक्तांसाठी २२ तास खुले होते. या काळात विठ्ठलाचे सर्व नित्योपचार बंद ठेवले जातात. तो शीण घालविण्यासाठी प्रक्षाळपूजा केली जाते. त्यानिमित्त आज दुपारी १२.२० वाजता विठ्ठल -रुक्मिणीला गरम पाण्याने स्रान घालण्यात आले. तर सकाळपासून दर्शनाला येणारे भाविक विठ्ठल-रूक्मिणीच्या पायाला लिंबू साखर चोळत होते. दुपारी २.२० वाजता दहिदुधाचा अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महानैवेद्य दाखवला. या संपूर्ण विधीसाठी सकाळी ११.४५ ते दुपारी एक व दुपारी १.४५ ते ४ या दरम्यान दर्शन बंद करण्यात आले होते. प्रक्षाळपूजेनंतर नेहमीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आले.
पश्चिमद्वार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांच्या संकल्पनेतून चातुर्मासाची सुरूवात व प्रक्षाळपूजेनिमित्त पंढरपुरातील विविध महाराज मंडळींना एकत्र बोलावून संतपूजन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. गुरू महाराज देगलूरकर, ह.भ.प. चातुर्मासे महाराज, ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. अनिलकाका बडवे, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे, ह.भ.प. एकनाथ महाराज पिंपळनेरकर यांची गंगेच्या व चंद्रभागेच्या पाण्याने पाय धुऊन संतपूजा करण्यात आली.
------------------------
व्यापारी संघटनेकडून महाप्रसाद
मंदिरात महापूजा होत असतानाच दुसरीकडे विठ्ठल मंदिराबाहेरील पश्चिमद्वार व्यापारी संघटनेच्या वतीने पंढरपुरातील विविध महाराज मंडळींचे संतपूजन व विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करून प्रक्षाळपूजा करण्यात आली.