प्रक्षाळ पूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शिणवटा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:48 AM2019-07-22T03:48:29+5:302019-07-22T03:48:56+5:30
अनेक वर्षांची परंपरा : केशरयुक्त पाण्याने घातले स्नान; दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू
पंढरपूर (जि़सोलापूर): आषाढी वारी सोहळ्यादरम्यान २४ तास अखंडपणे उभे दर्शन दिल्यामुळे देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान घालण्यात आले़ त्यानंतर, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय रात्री १४ पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, सायंकाळी साडेपाच वाजताचे दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला थकवा येतो, असे मानले जाते. देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी वारी सोहळ्यानंतर मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यानुसार २१ जुलै रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले़
प्रक्षाळ पूजा मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक केली. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाºयाला देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़ आजपासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. प्रक्षाळपूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरु झाले. पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता़ गाभाराही फुलांनी सजविण्यात आला होता़
१४ पदार्थांपासून बनविला काढा
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़ हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़