विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन कामास सुरुवात

By काशिनाथ वाघमारे | Published: December 16, 2023 05:54 PM2023-12-16T17:54:24+5:302023-12-16T17:54:47+5:30

मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता कामे केली जाणार आहेत.

Vitthal-Rukmini temple conservation work started | विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन कामास सुरुवात

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन कामास सुरुवात

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांची मंदिरे खूप प्राचीन स्वरूपाची आहेत. मंदिरांचे सुशोभीकरण केल्यास त्यांची प्राचीन शैली जपण्यास मदत होणार आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामास शनिवारी बाजीराव पडसाळी येथे विधिवत पूजा करून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता कामे केली जाणार आहेत.

मंदिराच्या सर्वांगीण विकासकामाची सर्वंकष अंदाजित रक्कम ७३ कोटी ८५ लाख रुपयांचा आराखडा (डीपीआर) पुरातत्व विभागाच्या नामिका सुचीतील वास्तुविशारदांकडून तयार करण्यात आला. या आराखड्याला मंदिर समिती, जिल्हास्तरीय समिती व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील २३ मे २०२३ रोजी पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार रुपयांच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यास मान्यता दिली होती.
 
या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पुरातत्व विभागामार्फत ई-निविदा राबविली होती. त्यामध्ये मे. सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई-निविदा २७ कोटी ४४ लाख ११ हजार ७६५ रुपये मंजूर केली आहे. ही सर्व कामे मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता होणार असल्याचे ह.भ.प. औसेकर यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, बांधकाम विभागप्रमुख बलभीम पावले व ठेकेदार येवले उपस्थित होते.

ही कामे होणार सुरू...
याकामामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन, मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबो, सोळखांबो, अर्धमंडप इ.), रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण, महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळी ५, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर, मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता काशी विश्वेश्वर, शनैश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) मंदिरातील दीपमाला कामे प्रस्तावित आहेत.

Web Title: Vitthal-Rukmini temple conservation work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.