पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता होणार ग्रीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:30 PM2019-05-03T12:30:07+5:302019-05-03T12:31:47+5:30
हडपसरचे भाविक देणार ३५० झाडे अन् कुंड्या
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आतील व बाहेरील परिसरात पुणे येथील एक भाविक कुंड्यांसह विविध प्रकारची ३५० झाडे ठेवणार आहे. यामुळे आता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ग्रीन होणार आहे.
हडपसर (पुणे) येथील नर्सरीचे मालक आर. व्ही. हिरेमठ यांनी समितीला मंदिराच्या बाहेरील बाजूस लावण्यासाठी वेगळी आणि मंदिराच्या आतील बाजूस लावण्यासाठी ३५० झाडे आणि कुंड्या मोफत देत आहेत. यासाठी त्यांना ५ लाख ५० हजारांच्या आसपास खर्च येणार आहे. त्यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात ७५ कुंड्या एका ट्रकमध्ये मंदिर समितीला पोहोचवल्या आहेत.
मंदिराच्या बाहेरील बाजूस अर्थात व्हीआयपी गेट, पश्चिमद्वार, महाद्वार, नामदेव पायरी तसेच मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर देखील सध्या बसविण्यात येत असलेल्या स्टीलच्या बॅरिेकेडिंगच्या कट्ट्यावर अशा प्रकारच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना अधिक प्रसन्न वाटणार आहे.
या प्रकारची झाडे असणार
मंदिरात आतील बाजूस म्हणजेच सावलीमध्ये मनीप्लँट, सेपलेरा, नागफणी (स्टँटीपायलम), झेनेड्रो आणि फिलोड्रेंड्राँन ही पाच ते सहा फूट उंच होणारी तर बाहेरील बाजूस उन्हात थंडावा देणारी आरेकापाम, पायकस ब्लँकीयाना आणि (रंगीबेरंगी) बोगन व्हेलीया ही पंधरा ते वीस फूट उंच होणारी रोपे लावण्यात येणार आहेत.
श्री विठ्ठल मंदिरात माझ्या राजेश्वरी नर्सरीची शेकडो झाडे लावण्याची संधी मला मंदिर समितीने दिली. श्री विठ्ठलाच्या श्रद्धेमुळे मी कुंड्या व झाडे मंदिर समितीला मोफत देत आहे.
- आर. व्ही. हिरेमठ
भाविक, हडपसर, पुणे
लाखो रुपयांच्या कुंड्यांसहित झाडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात लावण्यासाठी देत आहे. ७५ झाडे आणि कुंड्या मंदिर समितीकडे आलेली आहेत. काही दिवसांतच सर्वांना मंदिराचे नवे रूप पाहायला मिळेल.
- बालाजी पुदलवाड
व्यवस्थापक, मंदिर समिती, पंढरपूर