आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच; ऑनलाईनद्वारे मिळेल २४ तास दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:15+5:302021-06-04T04:18:15+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंढरपूर येथील भक्त निवासमध्ये पार पडली. यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंढरपूर येथील भक्त निवासमध्ये पार पडली. यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी औसेकर महाराज म्हणाले, मानाचे नैवेद्य आहेत, त्या सर्वांना देवाला मानाचा नैवेद्य दाखविण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांच्या पादुका व पालखी भेटी ठरलेल्या आहेत, त्या भेटी घडविण्यात येणार आहेत. मानाचे वारकरी, दिंडीकरी व मानाची महाराज मंडळी अशा १९५ मंडळींना देवाचे दर्शन देण्याचे ठरविण्यात आले आहे. पंढरपुरातील फडकरी व येणाऱ्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्यासाठी व पांडुरंगाच्या रथाला देखील विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्या सोडवण्यासाठी मंदिर समिती तयार असल्याचे महाराज औसेकर महाराजांनी स्पष्ट केले.
महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
२० जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.