पंढरपुरातील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुलं; रोज १ हजार भाविकांना घेता येणार दर्शन
By Appasaheb.patil | Published: November 16, 2020 08:41 AM2020-11-16T08:41:59+5:302020-11-16T08:42:42+5:30
ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच मिळणार दर्शन; पददर्शन नव्हे मुखदर्शन मिळणार
सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.
शासनाने तोंडावर मुखपट्टी(मास्क), योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली.
यानंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सहअध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनास परवानगी दिली आहे. तसेच सर्व भाविकांना दर्शनासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची वेळ निश्चित करावी लागणार आहे. ज्या भाविकांनी अशा पद्धतीचे दर्शन बुकिंग केले त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.
याशिवाय येणाऱ्या भाविकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझरचा वापर, तोंडावर मुख्पट्टी(मास्क) असणे बंधनकारक आहे.
एखाद्या भाविकाला ताप, सर्दी खोकला आदी लक्षणे दिसून आली तर त्या भाविकाला दर्शनास सोडण्यात येणार नाही.
याशिवाय ६५ वर्षापुढील, १० वर्षाखालील आणि गर्भवती महिलांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही.
प्रत्येक तासाला १०० भाविक दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचा बैठकीत निर्णय झाला आहे.