प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू

By काशिनाथ वाघमारे | Published: December 1, 2023 07:18 PM2023-12-01T19:18:26+5:302023-12-01T19:18:43+5:30

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी देवाचे राजोपचार बंद करून विठ्ठलाचे २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते.

Vitthal's shinvata spent by Praksala Puja After the Kartiki Yatra, the coronation of God begins | प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू

प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी देवाचे राजोपचार बंद करून विठ्ठलाचे २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. शुक्रवारी प्रक्षाळपूजा करून देवाचा शिणवटा घालवून देवाचे राजोपचार सुरू करण्यात आले आहेत. कार्तिकी यात्रेवेळी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भक्त येतात. प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी विठुराय हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रा काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धुपआरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलालादेखील थकवा आलेला असतो.

विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच कार्तिकी यात्रेनंतर एक चांगला (शुभ) दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो. अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्या अगोदर श्री विठुरायाच्या मूर्तीच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्याला लिंबू साखर लावण्यात आली.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान/पाणी घालण्यात आले. देवाला सायंकाळी आकर्षक पोशाख परिधान करून पारंपरिक अशा विविध दुर्मीळ अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे धुपारतीचा कार्यक्रम झाला. या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला श्री विठ्ठलाचा पलंगदेखील शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. विठुरायाचा शिणवटा नाहीसा व्हावा यासाठी रात्रीच्या वेळी विविध पदार्थांपासून बनविलेल्या असा खास आयुर्वेदिक काढादेखील दाखविण्यात आला.

Web Title: Vitthal's shinvata spent by Praksala Puja After the Kartiki Yatra, the coronation of God begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.